महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेले 50 खोके सध्या देशाच्या राजकारणातही चर्चेचा विषय बनले आहेत. यावर आजच्या सामनातून (Saamana Editorial) टीका करण्यात आली आहे. “मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी जाहीरपणे सांगितले आहे की, ‘महाराष्ट्रातील खोक्यांचा फॉर्म्युला वापरून ‘आप’चे आमदार विकत घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे.’ म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसलेल्या खोकेवाल्यांचा उद्धार झालाच. बिहारात राजद-जदयुचे नेते जाहीरपणे बोलत आहेत, ‘महाराष्ट्र में जो खोकेवाली राजनीती हुई, वो बिहार में फेल हो गयी!’ पायरीवरच्या खोकेवाल्यांनी हे नीट समजून घ्यावे. गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले पडले आहे. महाराष्ट्राला हा कलंकच लागला म्हणायचा. जगाच्या पाठीवर ‘बोको हराम’ नावाची एक बदनाम संघटना आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘खोके हराम’ नावाची संघटना उदयास आली आहे. त्यात बोकेही आहेत आणि खोकेही आहेत. हरामखोरी हाच त्यांचा धर्म आहे. ‘खोके हरामां’चे अस्तित्व फार काळ राहणार नाही, हे मात्र नक्की!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.