‘निर्ढावलेले लोक महान माणसावर…,’ अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत?
शरद पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपले काका शरद पवार यांची भेट घेतली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजितदादांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत बंडाळी करुन दोन वर्षांपूर्वी चाळीस एक आमदार घेऊन गेलेले अजित पवार यांनी विधानसभेत पुन्हा ४१ आमदार निवडून आणले आहेत.आता महायुतीत उपमुख्यमंत्री पद देखील मिळविले आहे. त्यानंतर अजितदादांनी आज अचानक शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची दिल्लीत सहा जनपथ निवासस्थानी आज भेट घेत शुभेच्छा दिल्या आहेत. यावर राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी यावर आपल्या खास शैलीत टीका केली आहे. निर्ढावलेले लोक महान माणसावर चिखलफेक करुन शुभेच्छा द्यायला आले अशा शब्दात संजय राऊत यांनी अजितदादांवर टीका केली आहे. शुभेच्छा देणे ही आपली संस्कृती आहे. आमचा धीर नसता झाला आम्ही असे काम केले असते तर… मी जर पाठीत खंजीर खुपसला असता तर असे शुभेच्छा देण्याचे धाडस केले नसते असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.तर राजकारणा पलिकडे कौटुंबिक संबंधही असतात असे अजित पवार यांनी म्हटले आहे.