मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डी (Shirdi NCP) येथील अधिवेशन संपल्यानंतर एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) आणि भाजपची युती असलेलं सरकार पडणार असल्याचं भाकित जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं. त्यानंतर अजित पवार यांनीदेखील आकड्यांचं गणित सांगत, 145 चा आकडा गाठला जाईल, तेव्हा हे सरकार कोसळेल, असं वक्तव्य केलंय. त्यानंतर अमोल मिटकरी यांनीही याला दुजोरा दिला. यावर एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उत्तर दिलंय. पुढचे 15 वर्ष तरी शिंदे आणि फडणवीस हेच महाराष्ट्रावर राज्य करतील, असं त्यांनी म्हटलं..
शहाजी बापू पाटील टीव्ही9 शी बोलताना म्हणाले, ‘ अशी भाकितं यापूर्वीही झाली आहेत. 1995 साली मी काँग्रेसचा आमदार होतो. त्यावेळी 5 वर्ष पवारसाहेब सांगायचे. सरकार पडणार. पण मनोहर जोशी आणि राणे साहेबांचं सरकार काही केल्या पडलं नाही. आम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागलं. आताही सरकार पडणार पडणार म्हणतायत..
भाजप-शिंदेंकडे एकामागून एक लोक जातायत, त्यांना भीती दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशी वक्तव्य करतायत, असं वक्तव्य शहाजी बापू पाटील यांनी केलंय.
सध्या भाजप-शिंदे सरकारकडे 175 चा खणखणीत आकडा आहे. त्यामुळे 145 चा आकडा गाठल्यावर सरकार पडणार, असं वक्तव्य करणाऱ्या अजित पवार यांची भीती बाळगण्याचं कारण नाही, असं शहाजी बापू पाटील म्हणाले. कारण 1995 मध्ये आमदारांचं संख्याबळ कमी असतानाही त्यांना हे करता आलं नाही. आता एवढा मोठा आकडा खोडून काढणं त्यांना जमणार नाही, असा विश्वास शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला.