मुंबईः भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत, असा घणाघात शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या आरोपानंतर भास्कर जाधव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे जादूटोणा करतात. शरद पवार यांच्या ताब्यात आला की तो सुटत नाही. महाराष्ट्राला हे माहिती आहे, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातऱ्यात केलं. त्यावर भाजपवर जाधव यांनी जोरदार टीका केली.
भास्कर जाधव माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘ भाजपचे नेते एका बाजूला साधनशूचितेचा आणि समंजसपणाचा आव आणतात. आपण कटूता संपवली पाहिजे. द्वेष संपवला पाहिजे म्हणतात. भाजपच्या प्रांताध्यक्षांनी शरद पवार यांच्याबद्दल असं वक्तव्य केलं असेल तर भाजपचा फॉरमुला हाच आहे. दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे…
एका बाजूला द्वेष संपवूया असं सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला द्वेषमूलक वक्तव्य करायची, ही भाजपची जुनी खोडच आहे, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलंय.
आज देशात द्वेषाचं वातावरण आहे. देशाच्या एकतेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या वतीने भारत जोडो यात्रा काढली आहे. देशाची लोकशाही, घटना टिकते की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे…
त्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देशाच्या एकतेसाठी उपस्थित राहणार आहेत. ज्यांचा घटनेवर विश्वास आहे त्यांनी भारत जोडो यात्रेत शामिल व्हावं, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलंय.