मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने दसरा मेळाव्यात गर्दी करण्यासाठी कोट्यवमधी रुपये खर्च केल्याचा आरोप शिवसेना नेत्यांकडून करण्यात येतोय. विशेष म्हणजे चंद्रकांत खैरेंनी (Chandrakant Khaire) एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) इशाराच दिलाय. औरंगाबादहून मी विमानातून मुंबईला येत होतो. यावेळी विमानात कोण आहे, हे मागे वळून पाहिलं तर सत्तार यांचे 40 लोक होते. एवढा खर्च हे कुठून करतायत, असा प्रश्न चंद्रकांत खैरे यांनी विचारला.
तसेच मी यापूर्वीही सांगितलंय, राज्यभरातून लोकांना आणण्यासाठी ५२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तो केवळ येण्या-जाण्याचा आकडा होता. त्यापेक्षाही कित्येक पटींनी जास्त पैसा खर्च करण्यात आलाय, असा आरोप खैरेंनी केलाय.
आजचा दसरा मेळावा होऊन जाऊन द्या, उद्या मी यापेक्षाही मोठा स्फोट करणार आहे. त्यानंतर शिंदे गटाला दंड भरावा लागला नाही तर माझं नाव लावणार नाही, असा इशारा खैरे यांनी दिलाय.
या मेळाव्यात शिंदे गटात काही आमदार, नेते जाणार अशी चर्चा आहे. मात्र असं कुणीही जात नाही. उलट गेलेलेच परत येतील, असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला.
ज्या पद्धतीने अवैध वाहतूक केली, तो एक गुन्हा दाखल होणार आहे. अपघात झाले ही दुसरी गोष्ट आहे. ज्या महामार्गावरून तुम्ही जनतेला सोडत नाही, तिथून तुम्ही कसे गेले, हा प्रश्न आहे, असं वक्तव्य खैरेंनी केलंय.
एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते शेकडो वाहने घेऊन समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने आले. यावरून सध्या वादंग सुरु आहे. समृद्धी महामार्गाचं अद्याप उद्घाटन झालेलं नसताना हे कार्यकर्ते कसे मार्गावरून गेले, असा सवाल शिवसेनेच्या वतीने करण्यात येतोय.