मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आवाज उठवल्यामुळे त्यांना अटक झाली असेल तर त्याचं स्वागत आहे.. छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivsaji Maharaj) इतिहास खोटा सांगितला जात असेल आणि त्याविरोधात आवाज उठवला जात असेल तर आम्हा सर्वांना अटक झाली तरी चालेल. आम्ही सर्व जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्ही जेलभरो आंदोलन करायला तयार आहोत, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मांडली.
जितेंद्र आव्हाड यांना आज वर्तक नगर पोलीसांकडून अटक करण्यात आली. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये त्यांनी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडण्यासाठी आंदोलन केलं होतं. यावेळी प्रेक्षकांना मारहाण झाल्याचा आरोप केला जातोय.
या मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना आज अटक करण्यात आली. या घटनेवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर कुठून दबाव येतोय? ही अटक कोणत्या सेक्शनखाली होतेय? व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड मारमारी करताना दिसतायत का?
मी व्हिडिओ पाहिला, त्यात आव्हाड हाताची घडी घालून उभे आहेत. मग शांत बसला तरी गुन्हा ठरतो का? सत्ता काबीज करण्यासाठी यांना काय काय करावं लागतंय.. शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती देत असाल तर चुकीचं आहे. यामागे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे, हे शोधा, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय.
हर हर महादेव चित्रपटातील वादग्रस्त प्रसंगांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला वाटतं राजकीय पक्ष बाजूला ठेवू आणि इतिहासकारांनी एकत्र येऊन चर्चा करावी. गांधी हा सिनेमा उत्तम होऊ शकतो. तर हा सिनेमा का व्यवस्थित होऊ शकत नाही? मी इतिहास वाचलाय, त्यात असं काही नव्हतं, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय.