Video | ‘या’ मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळणारच नाही, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा
मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळालेले आहे. मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाबाबतची मोठी मागणी मान्य झाली आहे. कुणबी नोंदी असलेल्या नागरिकांच्या सगेसोयऱ्यांना प्रतिज्ञापत्रावर आता कुणबी प्रमाणपत्र मिळण्यातील सर्व तांत्रिक अडचणी दूर होणार आहेत.
मुंबई | 27 जानेवारी 2024 : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळविताना येत असलेल्या अडचणीबाबत मागणी केली होती. त्याबद्दल राज्य सरकारने तातडीने परिपत्रक काढत दिलासा दिला आहे. यामुळे मराठा समाजाने आंदोलन स्थगित केले आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांच्या कोणत्याही नोंदी सापडणार नाहीत, त्यांना आरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कुणबी नोंदी आढळलेल्या नागरिकांच्या सगे सोयऱ्यांनाच प्रतिज्ञापत्रावर कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. यामुळे ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांना काही शंका आहेत. परंतू त्यांनाही आपण सांगू इच्छीतो की यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. काल मनोज जरांगे यांचे ‘चलो मुंबई’चे आंदोलन सुरु होते. त्यांनी उपोषण सुरु केले होते. त्यावर अतिशय चांगला मार्ग निघाल्याने या आंदोलनाची सांगता झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यातून अतिशय चांगला मार्ग काढल्याचे त्यांनी म्हटले आहे.