‘आम्ही म्हणतो हेच व्हायला पाहीजे….’ तायवाडे यांचा जरांगे यांना सल्ला
मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक लाखोच्या संख्येने मुंबईच्या वेशीपर्यंत येऊन पोहचले आहेत. या बाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सल्ला दिला आहे. सरकार आणि आंदोलक यांनी एकत्र येऊन यावर मध्यस्थ मार्ग काढावा आणि आपल्या निर्णयाचा दुसऱ्यांवर परिणाम होत नाही ना याची काळजी घ्यावी असाही सल्ला तायवाडे यांनी दिला आहे.
नागपूर | 26 जानेवारी 2024 : सरकारी पक्ष आणि आंदोलक दोन्ही पक्षांनी एकत्र बसून यातून सन्मान्य तोडगा काढायला हवा, आम्ही म्हणतो तेच व्हायला पाहीजे असे करू नये असा सल्ला मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. आपली मागणी संविधान चौकटीत बसते काय ? याची देखील काळजी घ्यायला हवी. कारण संविधानिक कक्षेत ती मागणी बसणारी नसेल आणि न्यायालयीन प्रक्रियेत ती टीकणारी नसेल तर सरकार ती मागणी पूर्ण करु शकत नाही. सरकारने निवृत्त न्यायाधीशांची एक समिती नेमली आहे. योगायोगाने या समितीतील तिन्ही सदस्य मराठा आहेत. या समितीचा सल्ला घेऊन सरकार आंदोलकांपुढे जात आहे. आंदोलकांनी निवृत्त न्यायाधीशांची मदत घ्यावी. दोन्ही पक्षांनी मध्यम मार्ग काढून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. आपल्या आंदोलनामुळे दुसऱ्या समाजावरती काही वाईट परिणाम होणार नाही याचीही काळजी घ्यावी. सरकारने दिलेल्या प्रस्तावावर विचार करुन काही मध्यस्थी मार्ग काढता येतोय का ? याची चाचपणी करावी तरच आंदोलनकर्त्यांना नक्की यश मिळेल असेही तायवाडे यांनी म्हटले आहे.