मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रचंड थंडीतही आज राजकीय वातावरण (Maharashtra politics) तापलं आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने (BJP woman leader) जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केल्यानंतर टीव्ही 9 वर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, मी अनेक कार्यक्रमांना उपस्थित असते. त्या दिवशीही उपस्थित होते. साहेबांचा निघण्याचा वेळ होता. मलाही भेटायचं होतं…
मी भेटायला पुढे गेले. तर आमदारांना अडचण आली माझी. मी समोर होते. त्यांना जायला वाट नव्हती. त्यांनी मला गच्च धरून बाजूला करून फेकून दिलं. मला ढकललं. आज हे माझ्याबरोबर झालंय. हे कुणाबरोबरही होऊ शकतं.
आमदार साहेबांचं वागणं खूप चुकीचं होतं.
माझ्या परवानगीशिवाय मला हात लावलाय, त्याची मी खूप निंदा करते. मी आपले पोलीस आणि गृहमंत्र्यांना विनंती करते. जे माझ्याबरोबर झालंय, त्यानुसारच कलम लावा. ३५४ कलम लावून मला न्याय देण्याची मागणी तुमच्याकडे करतेय, अशी प्रतिक्रिया भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने दिली आहे.
पाहा महिला नेत्याचे आरोप काय?
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये कलम 354 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संतापलेल्या आव्हाड यांनी थेट विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंब्रा येथे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाय ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलं. या नवीन पुलाच्या उद्घटन प्रसंगी हा प्रकार घडल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्याने केला आहे. संबंधित महिलेने मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये तिचा विनयभंग झाल्याची तक्रार दाखल केली आहे. महिलेने दिलेल्या एफआयआरची तक्रार कॉपी व्हायरल होत आहे. त्यांनी मला वेगळ्या उद्देशाने स्पर्श केला. त्यामुळे माझ्या मनात लज्जा उत्पन्न झाली. त्यानंतर लगेच मी पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ यांच्याकडे गेले. असं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.