105 लाख टन ऊसाला 91 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन, उतार कमीच

| Updated on: Nov 17, 2021 | 4:46 PM

कारखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत 105 लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. तर या बदल्यात 91 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन मिळालेले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उतार कमीच असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकच्या पावसाचा परिणाम ऊस उत्पादनावरही झाला आहे.

105 लाख टन ऊसाला 91 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन, उतार कमीच
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई : ऊसाचा गळीत हंगाम सुरु होऊन बरोबर महिना झाला आहे. या महिन्याभराच्या कालावधीमध्ये राज्यातील 139 साखर कारखान्यांची धुराडी पेटलेली होती. या कारखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत 105 लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. तर या बदल्यात 91 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन मिळालेले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उतार कमीच असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकच्या पावसाचा परिणाम ऊस उत्पादनावरही झाला आहे.

राज्यात ऊस कारखाने सुरु होण्यापूर्वी मंत्रीमंडळाची बैठक ही पार पडली होती. त्या दरम्यान, 15 ऑक्टोंबरपासून ऊसाचा गळीत हंगाम सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. तर एफआरपी थकीत असलेल्या साखर कारखान्यांची परवानगी ही नाकारण्यात आली होती. यानंतरही 139 साखर कारखान्यांच्या माध्यमातून हे गाळप करण्यात आले आहे. कोल्हापूर विभागात सर्वाधिक ऊसाचे गाळप झालेले आहे.

ऊसाची पळवापळवी झाली नाही

उस गाळप हंगाम सुरु करण्यापूर्वी साखर आयुक्त व मंत्रीमंडळाची बैठक पार पडली होती. त्या दरम्यान, जाहीर केलेल्या तारखेपूर्वी ऊसाचे गाळप सुरु झाले तर कारवाईचे संकेत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले होते. त्यानुसार 15 ऑक्टोंबरपासून गाळप करण्याचे ठरले. मात्र, त्या पूर्वी गाळप सुरु करुन ऊसाची पळवापळवी कारखान्यांनी केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे केवळ 3 साखर कारखान्यांनी वेळेच्या आगोदर गाळप सुरु केले होते. त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचे साखर आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.

असे झाले आहे ऊसाचे गाळप

कोल्हापूर विभागात 29 कारखान्यांनी 29.84 लाख टन ऊसगाळप करून 29.7 लाख क्विंटल साखर तयार केली आहे. पुणे विभागात 26 कारखान्यांनी 26.9 लाख टनाचे गाळप करून 24.5 लाख क्विंटल, तर सोलापूर पट्ट्यातील 31 कारखान्यांनी 19.1 लाख क्विंटल साखर तयार केली आहे. त्यासाठी 23.91 लाख टन उसाचे गाळप सोलापूर भागात केले गेले. ऊस गाळपात नगर जिल्हा पिछाडीवर दिसतो आहे. नगर विभागात 19 कारखाने सुरू झालेले आहेत. त्यांनी 13.36 लाख टन उसाचे गाळप करून 10.53 लाख क्विंटल साखर तयार केली आहे.

विनापरवाना गाळप करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई

एफआरपी थकीत असलेल्या साखर कारखान्यांना गाळपाची परवानगी नाकारण्यात आली होती. असे असतानाही मध्यंतरी काही साखर कारखाने हे सुरु असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. शिवाय राज्यातील तीन साखर कारखान्यांनी 15 ऑक्टोंबर पूर्वीच गाळपाला सुरवात केली होती अशा साखर कारखान्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरु असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे.

‘एफआरपी’ एकरकमेतच अदा करावी लागणार

थकीत ‘एफआरीपी’ ची रक्कम शेतकऱ्यांना देण्याबाबत राज्य सरकारने मधला मार्ग काढला होता. ही रक्कम शेतकऱ्यांना तीन टप्प्यात देण्याबाबत राज्य सरकारकडे शिफारस करण्यात आली होती. मात्र, सरकारच्या या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विरोध करण्यात आला होता. शिवाय राज्य सरकारच्या या शिफारसीवर केंद्राने अद्यापपर्यंत कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे ‘एफआरपी’ रकमेचे तीन तुकडे न करता एकरकमीच रक्कम अदा करावी लागणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या :

आनंदवार्ता : सोयाबीन 6 हजाराच्या पार, शेतकऱ्यांचा संयम आला कामी

PM किसान योजनेत अनियमितता, महाराष्ट्रातील 4 लाख 45 हजार शेतकऱ्यांना द्यावा लागणार परतावा

सात दिवसांत 1 हजार रुपयांनी कांद्याच्या दरात घट, सरकारच्या निर्णयामुळेच शेतकऱ्यांचा वांदा