लातूर : वावर तिथं पावर असं म्हटलं जातं, हे काही खोट नाही. मेहनत केली की, यश मिळतेच. असं यश मिळवलं आहे एका लातूरच्या शेतकऱ्यानं. आधी फळबाग लागवड केली होती. पण, त्याचा खर्च जास्त होता. त्यामानाने उत्पादन फारसे मिळत नव्हते. अशावेळी शेतकऱ्याने कोथिंबीर लागवड करण्याचा निर्णय घेतला. पाच एकर जागेत कोथिंबीर लागवड करून या शेतकऱ्यांनी पाच वर्षात कोट्यवधी रुपये कमवाले आहेत.
राज्यात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात होते. मात्र, लातूर जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांना कोथिंबीरच्या पिकाने लखोपती बनवले आहे. औसा तालुक्यातील आशीव येथील रमेश वळके असे या शेतकऱ्याचे नाव आहे. रमेश वळके यांच्या जीवनात कोथिंबीर पिकाने आमुलाग्र बदल केला आहे.
रमेश वाळके म्हणाले, २०१३-१४ ला बाग होती. त्यामध्ये एक-दोन वर्षांत पिकाने साथ दिली नाही. ५० टन माल होता. पाच लाख उत्पादन मिळाले. पण, वर्षभराचा खर्च करून फायदा काहीच झाला नव्हता. २०१९ ला पाच एकरातून कोथिंबीर पिकातून २५ लाख रुपये मिळाले होते.
कोथिंबीर लागवडीतून २०२० ला १५ लाख रुपये झाले. २०२१ ला १३ लाख रुपये झाले. यंदाही १६ लाख रुपये मिळाले. गेल्या चार-पाच वर्षांत एक कोटी रुपयांचे उत्पन्न पाच एकर कोथिंबीर लागवडीतून मिळाले.
या कोथिंबीरच्या पैशातून लातूरला घर घेतलं. गाडी घेतली. पोरांचं शिक्षण झालं. कोथिंबीर पिकाला एकरी २० हजार रुपये खर्च येतो. १५ मे ला पेरणी केल्यास जूनमध्ये उत्पन्न मिळते. जूनमध्ये पेरणी केली की जुलैमध्ये उत्पन्न मिळते. दोन पिके झाली तरी एकरी तीन ते साडेतीन लाख रुपये मिळतात.
जास्त फवारण्याही कराव्या लागत नाही. व्यापारी जागेवर येऊन माल घेऊन जातात. हमखास उत्पन्न आहे. शेतकऱ्यांनी याकडे वळायला हरकत नाही. अवघ्या ३५ दिवसांच्या या पिकाने पाच एकरात १६ लाख रुपयांची कमाई झाली आहे . रमेश वळके यांनी गेल्या पाच वर्षात त्यांनी एक कोटी रुपये कोथिंबिरीच्या उत्पादनात मिळवले आहेत .
रमेश वळके यांच्याकडे एकूण वीस एकर जमीन आहे. त्यापैकी पाच एकरावर ते दरवर्षी कोथिंबीरची उत्पादन घेतात. गेल्या आठवड्यात त्यांनी आपल्या कोथिंबिरीचा प्लॉट १६ लाख ३६ हजार रुपयांना विकला. कोथिंबिरीच्या कृपेने त्यांची जीवन पद्धती बदलली आहे. लातुरात पन्नास लाखांचे घर, फिरायला २५ लाखांची गाडी, मुलांचे उच्च शिक्षण असं सगळं काही कोथिंबीरच्या कृपेने झाले.