औरंगाबाद : निसर्गाच्या लहरीपणाचे चक्र (Kharif season) खरिपानंतर सध्या रब्बी हंगामातही सुरुच आहे. (Heavy Rain) अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची आर्थिक मदत या महिन्याच्या सुरवातीलाच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती. शिवाय काही शेतकऱ्यांची रक्कम ही प्रक्रियेतच अडकलेली आहे. असे असताना आता दोन दिवसांपूर्वी झालेल्या (Untimely rains) अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरवात झाली आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे तर नुकसान होत आहेच शिवाय प्रशासकीय यंत्रणा आणि अधिकच्या खर्चाचा भर प्रशासनावरही तेवढाच पडत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड जिल्ह्यात पावसाने अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने फळपिकांसह रब्बी आणि खरिपातील पिकांचेही नुकसान झाले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, पैठण, पचोड या भागात अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गोदावरी काठच्या गाव शिवारात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक पाहणी महसूलसह विभागीय कृषी अधिकाऱ्यांनी केलेली आहे. यासंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॅा. भागवत कराड यांनी मराठवाड्यातील नुकसानीचा आढावा घेतला असून त्वरीत पंचनामे करण्याच्या सुचना कृषी विभाग आणि महसूलच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात पंचनाम्यांना सुरवात झाली नसली तरी कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी आता पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ लागले आहेत.
औरंगाबादसह बीड आणि नांदेड जिल्ह्यात झालेल्या गारपिटमुळे गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, शेवगा, डाळिंब या पिकाचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिकांचा पेरा होऊन केवळ महिन्यााचा कालावधी लोटलेला आहे. त्यामुळे पिके बहरात होती. शिवाय मुबलक पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांनी योग्य नियोजनही केले होते. मात्र, वातावरणातील बदल आणि आता अवकाळी, गारपिट यामुळे या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे खरिपाप्रमाणेच रब्बी हंगामातील पिक संरक्षणावर शेतकऱ्यांना अधिकचा खर्च हा करावाच लागणार आहे. खरीप पाठोपाठ रब्बी हंगामावरही कायम संकट असल्याने उत्पादनात घट होण्याची भिती आतापासून व्यक्त होत आहे.
अतिवृ्ष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानभरपाईमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचाही वाटा असतो. पंचनाम्यानंतर महसूल विभागाकडील अहवाल सादर केल्यानंतर ही नुकसान भरपाईची रक्कम अदा केली जाते. त्यानुसार राज्य सरकारने 724 कोटी तर केंद्र सरकारने 899 कोटी रुपये हे शेतकऱ्यांसाठी अदा केले होते. आता पुन्हा पंचनाम्यांना सुरवात झाली असल्याने मदतीबाबत शेतकरी आशादायी आहे.