बीड | 22 जुलै 2023 : राज्यभरात भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. मेथीपासून टोमॅटोपर्यंत आणि मिरचीपासून लसणापर्यंत सर्वांचेच भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणीचं किचनचं बजेट कोलमडलं आहे. बीडमध्येही टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे दर वाढले आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांच्या टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे. बीडच्या अडत मार्केटमध्ये एका शेतकऱ्याच्या टोमॅटोला घसघशीत भाव मिळाला. हातात भरपूर पैसा आला. घरातून निघताना अपेक्षाही नव्हती, त्यापेक्षा अधिक रक्कम खिशात आली. त्यामुळे हा शेतकरी प्रचंड खूश झाला. त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. तो इतका की त्याने चक्क तोफा वाजवून जल्लोष साजरा केला.
टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्याची बीडच्या अडत बाजारात लगबग सुरू झाली आहे. सध्या बीडच्या अडत मार्केटमध्ये टोमॅटोच्या 22 किलोच्या कॅरेटला 2000 ते 2300 रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच चंगळ झाली आहे. कधी नव्हे ते या हंगामात टोमॅटोच्या उत्पादनातून भरपूर पैसा हाती येत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत आहे.
बीडचा एक शेतकरीही शनिवारी या मार्केटमध्ये टोमॅटो घेऊन आला होता. त्याच्या टोमॅटोच्या 22 किलोच्या कॅरेटला चक्क 2 हजार रुपयांचा भाव मिळाला. हातात रोखीने पैसे आले. त्यामुळे या शेतकऱ्याला प्रचंड आनंद झाला. या आनंदाच्या भरातच त्याने थेट मार्केटमध्येच तोफा वाजवून आनंद व्यक्त केला. प्रचंड जल्लोष साजरा केला. या शेतकऱ्याला आनंदित झालेलं पाहून इतर शेतकरीही त्याच्या आनंदात सहभागी झाले. त्यांनीही नाचून आपला आनंद व्यक्त केला.
सध्या बीडच्या बाजारामंमध्ये 130 ते 140 रुपये किलोने टोमॅटोविकले जात आहेत. पुण्या मुंबईच्या ठिकाणीही टोमॅटो 140 ते 150 रुपये किलोने विकले जात आहेत.
दरम्यान, धुळे तालुक्यात टोमॅटोची आवक होत नसल्याने तसेच बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडे नारायणगाव, पिंपळगाव, पुणे तसेच इतर परिसरातून होत असलेल्या टोमॅटोची आवक हव्या तेवढ्या प्रमाणात होत नसल्याने सध्या टोमॅटोचे भाव वाढले आहेत. साधारणपणे 40 रुपये 50 रुपये दराने उपलब्ध होत असलेला टोमॅटो हा सध्या 80 रुपये ते शंभर रुपये प्रति किलो दराने बाजारात मिळत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडली आहे .
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत येत्या काही महिन्यानंतर पुन्हा एकदा टोमॅटोची आवक सुरू होईल. त्यानंतर टोमॅटो मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत, असं व्यापारी तसेच विक्रेत्यांचे म्हणणे आहे. परंतु सध्या मात्र बाजारात उपलब्ध असलेला टोमॅटो हा जास्त दराने खरेदी करावा लागत आहे. त्याबरोबरच हिरव्या मिरचीची किंमत देखील वधारलेली असून फक्त पताकोबी कमी दरात उपलब्ध होत आहे.
इतरही सर्व भाज्यांचे दर आवक कमी राहिल्याने किलोमागे 10 ते 20 रुपये वाढलेले आहेत. आगामी एक ते दीड महिना आणखी सर्वसामान्य नागरिकांना जास्त दराने भाजीपाला खरेदी करावा लागणार आहे. त्यानंतर मात्र आवक सुरळीत झाल्यावर दर कमी होतील, अशी अपेक्षा विक्रेते पंकज धात्रक या सर्वसामान्य व्यक्तीने व्यक्त केली आहे.