अहमदनगर : रब्बी हंगामाच्या सुरवातीपासून शेतीसाठी दिवसा विद्युतपुरवठा करण्याची मागणी विविध संघटना आणि शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, हंगाम संपला तरी ही मागणी पूर्ण झालेली नाही. असे असतानाच उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी शेतीसाठी दिवसा विद्युत पुरवठा या प्रश्नावर तर सावरासवर केलीच पण महावितरण कंपनीने यंदा योग्यरित्या परस्थिती हाताळल्याने राज्य भारनियमापासून बचावले असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मध्यंतरी केवळ सुरळीत विद्युत पुरवठा झाला नसल्याने पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे सध्या उत्पादनात घट झाल्याचे समोर येत आहे. असे असतानाच लोकप्रतिनीधींकडून अशी सावरासावर केली जात आहे.
राज्यात मुख्यमंत्री सौरउर्जा योजना राबवली जात आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवासा विद्युत पुरवठा केला जाणार असल्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी सांगितले आहे. कृषी उर्जा अभियानाचा शेतकऱ्यांना लाभ झालेलाच आहे. यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांनी चालू वीज बिल तसेच मार्च 2022 पर्यंतच्या थकबाकीचा 50 टक्के भरणा केल्याने त्यामध्येही 50 टक्के सवलत मिळाली होती. या योजनेच्या माध्यामातून शेतकऱ्यांना तब्बल 30 हजार 450 कोटी रुपयांची माफी मिळाली आहे. योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राज्यात कोळश्याची टंचाई निर्माण झाल्याने भारनियमन करण्याची नामुष्की ओढावली होती. मात्र, यामध्येही ज्या भागात नियमित वीजबील अदा केले जाते त्या भागात सुरळीत विद्युत पुरवठा करण्यात आला होता आणि ज्या भागामध्ये वीजचोरी केली जाते त्याच भागात अधिकचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे ग्राहकांनीही नियमित वीजबिल भरणा करणे गरजेचे आहे. तरच विद्युत पुरवठा सुरळीत राहणार आहे.
सबंध राज्यात महावितरणबाबत रोष व्यक्त केला जात असताना मात्र, राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी महावितरणमुळेच राज्यावरील भारनियमनाचे संकट टळल्याचे सांगितले. शिवाय प्रतिकूल परस्थितीमध्ये योग्य कारभार हाकल्याने नाररिकांना समस्यांना सामोरे जावे लागले नाही. दरवर्षी अशीच परस्थिती राहिली तर मात्र, न टाळता येणारे संकट उभे राहणार आहे त्यामुळे वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्याचे आवाहन त्यांनी शिर्डीत केले आहे.