विनय जगताप, मुळशी, पुणे | 8 डिसेंबर 2023 : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील प्रयोगशील शेतकरी लहू मारुती फाले यांनी खरीप हंगामातील निळा भाताची यशस्वी लागवड केली आहे. मलेशिया आणि थायलंड येथे उत्पादित होणाऱ्या या निळसर गडद जांभळ्या रंगाच्या तांदळाची परिसरात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या या तांदळात लोह, झिंक, कॅल्शिअम आणि भरपूर प्रमाणात ॲन्टीऑक्सीडंट आढळते. मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी हा तांदूळ गुणकारी ठरत आहे.
मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील प्रयोगशील शेतकरी लहू मारुती फाले यांनी खरीप हंगामात निळा भाताची (Blue-Rice) लागवड केली होती. तो आता तयार झाला आहे. हा तांदूळ निळसर गडद जांभळ्या रंगाचा आहे. हा भात मलेशिया आणि थायलंड येथेच उत्पादित होतो. या भाताचे वैशिष्ट्ये म्हणजे त्याला सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केले जाते. यामुळे बाजारात त्याला अधिक मागणी आहे.
गडद जांभळ्या रंगाच्या भाताचे उत्पादन एक एकरात १६०० किलोपर्यंत होते. हा तांदळास प्रतिकिलो २५० रुपये बाजारभाव मिळतो. औषधी गुणधर्मामुळे भात खरेदी करण्यासाठी शहरातील ग्राहक मोठ्या प्रमाणात पसंती देत आहे. निळ्या भाताच्या लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी आपण सध्या प्रयत्नशील आहोत. या भाताची लागवड करू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शन करु, असे फाले यांनी म्हटले आहे.
सेंद्रीय निळा तांदूळ आरोग्य वर्धक आहे. यामध्ये लोह, झिंक, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात आहे. हा तांदूळ ॲन्टीऑक्सीडंट आहे, यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी तो उपयोगी आहे. हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी हा गुणकारी आहे.
चिखलगावात लहू मारुती फाले यांनी आपल्या भागात हा पहिलाच प्रयोग केला आहे. यासाठी त्यांना तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे तसेच कृषी सहायक शेखर विरणक यांचे मार्गदर्शन लाभले. या भाताची उंची सात फुटापर्यंत होते. तो ११० ते १२० दिवसांत काढणीसाठी तयार होतो.