नागपूर : पीक पद्धतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढीचे प्रमाण आता वाढले आहे. शेती व्यवसयात अमूलाग्र बदल करण्याचे स्वप्न उराशी घेऊन अनेकजण धाडसी निर्णय घेतात. पण शेतकऱ्यांच्या या कष्टाला जोड हवी ती निसर्गाचीही अन्यथा काय परिणाम होतात हे जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील शेतकऱ्याकडे पाहिल्यावर लक्षात येते. मानापूर शिवारात 40 एकरामध्ये ( Chilli production) मिरची लागवड केली असता निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम या शेतकऱ्याला सामना करावा लागला आहे. आता पावसाने उघडीप दिल्यानंतर (pest infestation) औषध फवारणी करुनही मिरची उबदार येत नसल्याने लाखोंचा खर्च आणि मेहनत सर्वाकाही मातीमोल झाल्याची भावना त्या शेतकऱ्यांची झाली आहे
वातावरणातील बदलामुळे मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रतिकूल वातावरणामुळे मानापूर, मसला, बोरी, काचूरवाही, वडेगाव यासह अन्य शिवारातील मिरचीच्या पिकावर चुरडा व फुलकिडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. महागड्या औषधांची फवारणी करूनही या किडी नियंत्रणात येत नसल्याने काही शेतकऱ्यांनी मिरचीचे पीक उपटून रब्बीच्या दुसऱ्या पिकाचे नियोजन करण्याची नामुष्की ओढावली आहे. शेतकऱ्यांनी वेगळा प्रयोग केला मात्र, त्याला निसर्गाची साथ लाभली नाही. त्यामुळे उत्पादन पदरात पडायच्या आगोदरच त्याची मोडणी करावी लागली आहे.
रामटेक तालुका तसा भातशेतीसाठी प्रसिध्द आहे. मात्र, गतवर्षी काही शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्य़े बदल करुन मिरचीची लागवड केली. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरचीला मागील वर्षी चांगला भाव मिळाल्याने यावर्षी रामटेक तालुक्यात मिरचीचे लागवड क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत वाढले आहे. यावर्षी तालुक्यातील मानापूर येथील आनंदराव हिंगे व विनायक हिंगे यांनी प्रत्येकी दोन एकरात मिरचीची लागवड केली असून, रामनाथ मोटघरे यांनी, सारंग हिंगे व भाऊराव हिंगे, श्रीचंद सातपुते, जगनाथ घोल्लर यांची सर्वाची मिळून मानापूर शिवारात 40 एकरात मिरचीची लागवड केली होती.
रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी मिरचीच्या पिकावर प्रति एकर 70 ते 80 हजार रुपयांचा खर्च केला आहे. बहुतेकांनी बेड तयार करून तसेच मल्चिंग पेपरचा वापर करीत मिरचीची लागवड केली होती. तालुक्यातील शेतकरी हिरव्या मिरचीची विक्री करतात. 15 दिवसांपूर्वी हिरव्या मिरचीला प्रतिकिलो 22 ते 30 रुपये भाव मिळायचा. हे दर आठ ते नऊ रुपये किलोवर आले असून, एवढीच मजुरी आता मिरची तोडणीसाठी मोजावी लागत आहे.
चुराड्याच्या पतंगाचे नियंत्रण करणे आवश्यक आहे अन्यथा मिरचीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार नाही. याकरिता शेतात निळ्या रंगाचे चिकट सापळे लावावे. निंबोळी अर्काची फवारणी करावी. सुती कापडाला एरंडी तेलात बुडवून ते कापड झाडावरुन फिरवावा लागणार आहे. या संदर्भात डॅा. नंदकिशोर लव्हे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे मात्र, मोठ्या प्रमाणात मिरचीचे नुकसान झाले आहे.