जळगाव : कापसाला (Cotton) सध्या सोन्याचा भाव आहे. शिवाय दिवसाला कापसाच्या दरात वाढ होत आहे. दोन महिन्यापूर्वी असलेल्या (Rate increase) दरात आज दुपटीने वाढ झालेली आहे. असे असताना (Cotton Harvesting) कापूस पिकाची मोडणी हे संयुक्तिक वाटत नाही ना..पण हे सत्य आहे. उत्पादन घटल्यामुळेच कापसाच्या मागणीत वाढ झालेली आहे. मध्यंतरीचा पाऊस आणि आता गुलाबी बोंड अळीचा वाढता प्रादुर्भाव यामुळे खोडवा किंवा फरदड उत्पादन घेणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुर्वहंगामातील कापूस मोडून त्या क्षेत्रात रब्बी हंगामातील पिक घेण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे किमान रब्बीतून उत्पादन वाढेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे.
खरीप हंगामातील केवळ कापूस पिकाला चांगला दर मिळालेला आहे. सोयाबीन कवडीमोल दराने विकले जात आहे तर त्याचे दर हे स्थिर नसल्याने साठवणूक करावी की विक्री या संभ्रम अवस्थेत शेतकरी आहे. मात्र, यंदा कापसाचे दर 9 हजार क्विंटलवर गेले आहेत. शिवाय यामध्ये वाढ ही होतच आहे. मात्र, या पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला असल्याने उत्पादनात तर घट होणारच आहे पण शेतजमिनीचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे त्याची मोडणी करुन रब्बी हंगामातील पिक घेण्याच्या तयारीत शेतकरी आहेत.
खानदेशात दीड लाख हेक्टरावर पुर्वहंगामी कापसाची लागवड केली जाते. म्हणजेच मे महिन्यात लागवड केली जाते. यंदा मात्र, अधिकच्या पावसाने कापसाचे नुकसान झाले तर अंतिम टप्प्यात गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे एकरी 2 क्विंटल देखील उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. शिवाय कापसाला बोंड कमी आणि तोडणीला एका किलोसाठी 10 रुपये मजुरी द्यावी लागत होती. त्यामुळे पुर्वहंगामातील कापूस शेतकऱ्यांच्या पचनीत पडत नसल्याने त्याची मोडणी केली जात आहे. उत्पादन खर्च वाढला आणि उत्पादन घटले अशी अवस्था या पुर्वहंगामातील कापसाची झाली आहे.
यंदा पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. कापसाचे दर वाढलेले असले तरी उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांनाही पाहिजे त्या प्रमाणात फायदा झालेला नाही. खरिपात झालेले नुकसान रब्बीतून भरुन काढण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आता वेचणीवर अधिकचा खर्च न करता थेट कापसाची मोडणी करुन रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी याचे उत्पादन घेण्यावर भर दिला जात आहे. शिवाय रब्बी हंगामासाठी यंदा पोषक वातावरणही आहे. सिंचनाचा प्रश्न मिटला असल्याने उत्पादन वाढीची शेतकऱ्यांना आशा आहे.
कापसाला एकीकडे उच्चांकी दर तर दुसरीकडे पुर्वहंगामातील कापसाची मोडणी सुरु आहे. मोडणीपुर्वी शेतकरी या क्षेत्रात जनावरे चारण्यासाठी सोडत आहेत. तर कापसावर थेट रोटाव्हेटर फिरवत आहेत. त्यामुळे कापसाची काढणीही होत आहे. शिवाय रब्बीतील पेरणीपुर्व मशागतही असा दुहेरी उद्देश साध्य केला जात आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये खानदेशातील तब्बल 80 हजार हेक्टरावरील कापूस काढून टाकण्यात आलेला आहे. या क्षेत्रावर आता रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली जाणार आहे.
ऐन रब्बीत ‘डीएपी’ खताचा तुटवडा ; पुरवठ्यातही राजकारण, शेतकऱ्यांकडे काय आहे पर्याय?
बासमती तांदूळ अजून ‘भाव’ खाणार, पावसामुळे नुकसानीचा परिणाम दरावर