लातूर : कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी कवडीमोल दर यामुळे ( Marathwada) मराठवाड्यात (Cotton production) कापसाचे क्षेत्र घटत आहे. सोयाबीनप्रमाणेच कापूस हे खरिपातील मुख्य पिक होते. मात्र, काळाच्या ओघात शेतकऱ्यांनी सोयाबीन या नगदी पिकावरच भर दिला होता. त्यामुळे तब्बल 3 लाख हेक्टराने कापसाच्या क्षेत्रात घट झाली होती. शिवाय लागवड केलेल्या कापसाला अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा फटका बसल्याने उत्पादनही निम्म्यावरच आलेले आहे. सध्या कापसाचे दर वाढत असले तरी झालेला खर्च आणि घटलेले उत्पादन यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे.
मराठवाड्यातील बीड, हिंगोली जिल्ह्यात कापसाचे उत्पादन हे सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर घेतले जात होते. पण दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीनवर राहिलेला आहे. कापूस उत्पादनाला अधिकचा वेळ आणि वेचणी दरम्यान मजुरांचा वणवा यामुळे सोयाबीन याच नगदी पिकावर शेतकऱ्यांनी भर दिला होता. पण यंदा या दोन्हीही पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे.
सोयाबाीनप्रमाणेच कापूसही खरिपातील मुख्य पिक होते. परंतू, यंदा तर सरासरी क्षेत्रामध्येही घट झाली आहे. केवळ 15 लाख हेक्टर एवढेच कापसाचे क्षेत्र आता मराठवाड्यात राहिले आहे. यापैकी 12 लाख 68 हजार हेक्टरावर कापसाची लागवड करण्यात आली होती. यापुर्वी कापसाला 3 ते 4 हजार प्रति क्विंटलचा दर मिळाला होता तर सोयाबीन हे चढ्या दराने विकले जात होते. शिवाय कापसातील बोंडअळीमुळे मराठवाड्यातील शेतकरी हे त्रस्त होते. त्यामुळेच कापसापेक्षा सोयबीनला शेतकऱ्यांनी अधिकची पसंती दिली होती. बीड जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे घटलेले आहे.
यंदा पावसाचा परिणाम खरिपातील सर्वच पिकांवर झालेला आहे. सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले असले तरी ऐन वेचणीच्या दरम्यानच पाऊस झाल्याने कापसाचे उत्पादनही निम्म्यावरच आलेले आहे. सध्या बिटी कापूस शेतकऱ्यांनी काढून टाकला असला तरी देशी कापूस अद्यापही वावरातच आहे. मात्र, उत्पादन घटल्याने काढणी खर्चही परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. सध्या कापसाचे दर वाढले असले तरी घटत्या उत्पादनामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही.
पावसाचा परिणाम उत्पादनावर झाला असून यंदा केवळ एकरी एकच क्विंटल उत्पादन मराठवाड्याती शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे. यामध्ये कापूस वेचणीचा दर हा 12 रुपये प्रति किलोचा आहे. त्यामुळे उत्पादन तर घटले आहेच शिवाय कापूस शेतातून बाहेर काढण्यासाठीही अधिकचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे कापतसाच्या दरात वाढ झाली असली तरी प्रत्यक्षात याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. त्यामुळे बदलत्या परस्थितीमुळे क्षेत्रात तर घट झालीच आहे. पण पावसामुळे उत्पादनावरही मोठा परिणाम झाला आहे.
गरोदर गायीसाठी डोहाळजेवण आंध्रप्रदेशात जोपासली जातेय परंपरा
प्रक्रियेतच अडकली 5 लाख शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम, नेमकी काय आहे अडचण?