नांदेड : (Untimely rain) अनियमित पावसामुळे यंदाचा खरीप हंगामच पाण्यात गेला आहे. सुरवातीला मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला अतिवृष्टीचा फटका बसला होता तर त्यानंतर सुरु झालेली अवकाळी आता (Rabbi Sowing) रब्बीचा पेरा झाला तरी कायम आहे. खरिपातील तूर आणि कापूस ही दोनच पिके वावरात आहे. आता अंतिम टप्प्यात असलेल्या या पिकांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. (Marathwada) मराठवाड्यात तुरीची काढणी सुरु असतानाच झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे तर कापसाची बोंडे भिजल्याने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा निसर्गाने हिसाकावून घेतलेला आहे. खरीप हंगामापासून सुरु झालेले संकट कायम असल्याने आता उत्पादनावर याचा परिणाम होणार आहे.
खरीप हंगामात आंतरपिक म्हणून तुरीचे उत्पादन घेतले जाते. सुरवातीच्या अतिवृष्टीमध्ये हे पीक बहरात होते म्हणून पावसाचा परिणाम झााल नाही. पण मध्यंतरीच्या अवकाळी पावसापासून या पिकावरही दुष्ट्यचक्र सुरु झाले आहे. अवकाळीनंतर वातारणातील बदलामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेंगा पोसल्याच नाही. आता ऐन काढणीच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे तर काढणी झालेल्या तुरीच्या शेंगाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे खरिपातील एकाही पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी नसल्याने मध्यंतरी कापसाच्या दरात घट झाली होती. 9 हजार रुपये क्विंटलचे दर थेट 7 हजारावर येऊन ठेपले होते. दरवाढीच्या प्रतिक्षेत शेतकऱ्यांनी कापसाच्या साठवणूकीवर भर दिला होता. त्यानंतर कुठे गेल्या दोन दिवसांपासून कापसाच्या दरात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. नंदुरबार बाजारसमितीमध्ये विक्रमी 9 हजार रुपये दर मिळाला आहे. मात्र, अचानक झालेल्या पावसामुळे साठवणूक केलेला कापूसही भिजला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कितीही नियोजन केले तरी यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा खरीप हंगामातील पिकांना बसलेला आहे.
अककाळी पावसाचा परिणाम केवळ खरीप हंगामातील पिकांवरच झालेला नाही तर रब्बी पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले आहे. शिवाय सबंध राज्यात आता ढगाळ वातारवणामुळे रब्बी हंगामातील फुलोऱ्यात आलेल्या हरभरा पिकावर घाटीअळीचा प्रादुर्भाव वाढणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता 5 टक्के निंबोळी अर्क, एकरी 2 कामगंध सापळे व 20 पक्षा थांबे बसवावे लागणार आहेत. शिवाय अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यास इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के 4 ग्रॅम क्विनॅालफास हे 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे.