वाशिम : उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी कितीही पुर्वनियोजन केले, पीक पध्दतीमध्ये बदल केला तरी ऐन पीक पदरात पडण्याच्या दरम्यान अवकाळीचे संकट कायम राहिलेलं आहे. यंदा तर खरीप हंगामापासून हे प्रकर्षाने जाणवत आहे. यापू्र्वी सोयाबीन काढणीच्या प्रसंगी अतिवृष्टी, फळबागा बहरात असतानाच (Untimely rain) अवकाळी तर आता भाजीपाला बहरत असताना आणि तुरीची काढणी सुरु असतानाच झालेल्या ( hailstorm) गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे (crop damage) नुकसान झाले आहे. या अवकाळी आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याच्या वाफ्यामध्ये पाणी साचले असून कोथींबीर, मेथी, पालक हे पाण्यात आहे. तर तुरीच्या शेंगा अक्षरश: चिखलाने माखलेल्या आहेत. त्यामुळे आता काढणीही शक्य नसल्याने हे नुकसान भरुन काढावे कसे असा सवाल आहे.
अनियमित झालेल्या पावसामुळे आतापर्यंत खरीप हंगामातील पिकांचे तर नुकसान झालेलेच आहे. पण आता रब्बी हंगामातील पिके बहरतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या असून पिकांची मशागतीची कामे सुरु असतनाच झालेल्या पावसामुळे पिकाच्या वाढीवर तर परिणाम होणारच आहे शिवाय आता वातावरणातील बदलामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. त्याच्या नियंत्रणासाठी पुन्हा वेगळा खर्च हा वेगळाच त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचा प्रयोग केला होता. आता मेथी, कोथींबीर काढणीला आली असतानाच झालेल्या पावसामुळे भाजीपाला पाण्यात आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजापेक्षाही अधिकचा पाऊस वाशिम जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यातील कामरगाव, धनज बु गावासह सबंध जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तर अनेक ठिकाणी गारपिटही झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील उगवण झालेल्या पिकांना गारपिटीचा मारा लागल्याने आता पिकांची वाढ होते की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. मध्यंतरी अवकीळीमुळे झालेल्या फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही झालेले नाहीत. यात पुन्हा आता गारपिट आणि पावसामुळे झालेले नुकसान वेगळेच. त्यामुळे उत्पादनात झालेली घट आता सरकार भरुन देणार का हा सवाल आहे.
दर हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसलेला होता. त्या दरम्यान, राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनी 8 दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अजूनही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. अशी अवस्था असताना आता गारपिटमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करीत आहे. त्यामुळे पंचनामे झाले तरी प्रत्यक्ष मदत मिळणार का? हा खरा प्रश्न आहे.