अकोला : काही शेतकरी हे कांद्यातून तर काही बिजोत्पादानातून उत्पादन घेतात. बिजोत्पादन करुन रोपांची विक्री केली तरी त्यामधून अधिकचा नफा मिळतो. मात्र, ही प्रक्रिया किचकट असल्यामुळे शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात बिजोत्पदनावरच अधिकचा भर असतो. यंदा मात्र, शेतकऱ्यांची ही प्रक्रिया देखील अडचणीत आली आहे. नोव्हेंबर महिन्यात अचानक आठवडाभरापेक्षा अधिक काळ ( Change in environment) ढगाळ वातावरण राहिल्याने सर्वच पिकांवर (fungal disease) बुरशीचे प्रमाण वाढले. ढगाळ वातावरण तसेच नंतर धुके पडल्याने शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाचे नुकसान झाले. ढगाळ वातावरण, धुक्यामुळे कांदा रोपांवर व कांदा बिजोत्पादनावर परिणाम झाला. मर रोगांचा प्रादुर्भाव वाढून पिकाचे नुकसान होऊ लागले आहे.
रब्बी हंगामातील जातींची रोपे नोव्हेंबर -डिसेंबर महिन्यात लावली जातात. एप्रिल – मे महिन्यात कांदे काढून वाळवून ते कांदा चाळीत साठवले जातात. ऑक्टोबर महिन्यात चाळीतील कांदे निवडून बिजोत्पादनासाठी वापरले जातात. या प्रक्रियेत कांद्याची साठवण हा गुणधर्म आपोआप प्रत्येक पिढीत जोपासला जातो. कांदे रंगाने व आकारानुसार निवडले जात असल्याने पुढील उत्पादन अधिक चांगली निवडली जाते. कांद्यांना जवळ जवळ 5 ते 6 महिने विश्रांती मिळत असल्यामुळे फुलांचे बी मोठ्या प्रमाणात निघतात.
* रोपे लावून कांदे न काढता तसेच शेतात ठेऊन त्यांना फुले येऊ दिली जातात. या पद्धतीमध्ये खर्च कमी होतो, परंतु उत्पादनही कमी येते. कांदा जमिनीतून काढला जात नाही, त्यामुळे त्याची योग्य निवड करता येत नाही. त्यामुळे दर्जाहीन कांद्याचे प्रमाण वाढत जाते त्याचबरोबर रोगाचे व तणांचे प्रमाण वाढते. या पद्धतीमध्ये केवळ खरीप जातीचेच बी तयार करता येऊ शकते. अनेक अडचणी व त्रुटीमुळे ही पद्धत फारशी वापरली जात नाही.
* तर दुसऱ्या या पद्धतीत एका हंगामातील कांदा काढून तो साठवून, निवड करून दुसऱ्या हंगामात लावून बीजोत्पादन केले जाते. या पद्धतीमध्ये बियांचे उत्पादन जास्त येते, कांद्याची निवड करता येते. निवड केलेले कांदे लावल्यामुळे दरवर्षी नवीन पिढी सुधारत जाते. रब्बी हंगामाचे कांदे साठवून ठेवावे लागतात, त्यामुळे साठवण खर्च वाढतो. मात्र वाढीव उत्पादनामुळे हा खर्च नगण्य वाटतो.