सोलापूर : एक संकट ओढावले तर त्यातून सावरता येईल मात्र, संकटाची मालिका कायमच सुरु राहिली तर मात्र, शेतकऱ्यांना पळता भुई थोडी होते. याचा प्रत्यय यंदाच्या द्राक्ष हंगामात शेतकऱ्यांनी अनुभवला आहे. वर्षभर उत्पादन वाढीसाठी औषध फवारणी आणि द्राक्ष तोडणीच्या दरम्यानच बागा वाचविण्याची धडपड. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत वातावरणातील बदल अवकाळी आणि आता ‘डाऊनी मिल्ड्यू’ या रोगाने द्राक्षबागा उध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे हतबल शेतकऱ्याने आगामी वर्षात तरी यातून उत्पादन मिळेल या आशेने वाळलेले द्राक्षाचे घड आता तोडण्यास सुरवात केली आहे. प्रयत्नांची पराकष्टा करुनही शेतकरी द्राक्ष बागा वाचवू शकलेले नाहीत. त्यामुळे आता शासनाने तरी मदत करावी अशा मागणी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी हे करीत आहेत.
अवकाळी नंतर आता द्राक्षबागांवर डाऊनी मिल्ड्यू चा प्रादुर्भाव द्राक्षबागांवर झालेला आहे. यामध्ये बागेवरील द्राक्षाचे घड हे जागेवरच वाळून जात आहेत. वातावरणातील आर्द्रता आणि वाढलेल्या ऊनामुळे याचा अधिक परिणाम बागांवर होत आहे. त्यामुळे वाळलेले घड काढल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच नाही. पंढरपूर तालुक्यातील 10 हजार एकरावरील बागांना याचा धोका वाढला आहे.
अवकाळीचे संकट सबंध राज्यातील द्राक्ष बागायतदारांवर होते. अवकाळीने उघडीप दिल्यानंतरही पंढरपूर तालुक्यातील द्राक्षांवर फळकूज, मणीगळ, डाऊनी व भुरा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे बुरशीनाशकाची फवारणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, तोडणीच्या वेळी पुन्हा डाऊनी मिल्ड्यू चा प्रादुर्भाव वाढला आहे. तालुक्यातील 10 हजार एकरावरील बागा यामुळे बाधित झाल्या आहेत. यामध्ये द्राक्षांचे घड जागेवरच वाळून जात आहेत. शिवाय त्याचा परिणाम इतर पिकांवरही होत असल्याने मेंढापूर येथील शेतकरी बाबासाहेब पठाण यांनी द्राक्षाचे घड हे तोडून बांधावर टाकले आहेत. किमान पुढच्या वर्षी तरी यामधून उत्पादन मिळेल अशी आशा त्यांना आहे.
अवकाळीनंतर द्राक्ष बागांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी बुरशीनाशकाची फवारणी केली होती. मात्र, त्यानंतर आर्द्रता वाढली आणि उन्हामध्येही वाढ झाल्याने आता द्राक्ष बागांवर डाऊनी मिल्ड्यू चा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यापूर्वीच किडीचे नियंत्रण करुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे. आता अवकाळी नंतर का होईना पीक पदरात पडेल अशी आशा होती पण संकटाची मालिका ही सुरुच असल्याने आता द्राक्षघड तोडून आगामी वर्षातील उत्पादनावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.