अकोला : खरीप हंगामातील (Crop insurance) पीकविम्यापोटी 2 हजार 400 कोटी रुपये विमा कंपनीला दिले असल्याचे राज्य सरकारकडून सांगितले जात आहे. शिवाय शेवटच्या शेतकऱ्याला विम्याचा लाभ झाल्याचा अविर्भाव विमा कंपन्या आणत असल्या तरी अद्यापही (Kharif) खरिपातील उडीद आणि मूग या पिकाचा एक नया रुपयाही एकाही शेतकऱ्याला मिळालेला नाही. या दोन्ही पिकांचा विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या हजारोंमध्ये आहे असे असतानाही एकाही शेतकऱ्याला लाभ कसा नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे या पिकांचेही नुकसान झालेच होते. पण भरपाई अद्यापही कुणालाच नाही. याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत तर कृषी अधिकारी कोणतिही माहिती देत नसल्याने विचारणा कुणाकडे करावी असा सवाल आहे.
शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर या पिकांप्रमाणेच उडीद आणि मूगाचाही विमा हप्ता अदा केला होता. मध्यंतरी पीक नुकसानीची 25 टक्के रक्कम मिळाली. यामध्ये एकट्या अकोला जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार शेतकऱ्यांचा समावेश होता. मात्र, यामध्येही उडीद आणि मूगाचा समावेश नव्हता. जिल्ह्यातील 50 हजार हेक्टरावरील मूग आणि उडदाचे नुकसान झाले होते. या पिकांचीही भरपाई मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र, अद्यापही एकाही शेतकऱ्याला विमा रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे या पिकांचा विमा योजनेत सहभाग करुन घेतला आहे की नाही हा प्रश्न आजही कायम आहे.
खरीप हंगामातील पिकांचा विमाच मिळाला नाही म्हणून सध्या शेतकरी हे कृषी कार्यालयात तक्रार दाखल करीत आहेत. मात्र, उडीद आणि मूगाच्या पिकाच्या नुकसानीचा उल्लेखच नाही. त्यामुळे विमा कंपन्यांनी या दोन पिकांबाबत काय निर्णय घेतला आहे याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत. तर दुसरीकडे उडीद आणि मूगाच्या नुकसानभरपाईपोटी शेतकऱ्यांनी विमा रक्कम अदाही केली आहे. पावसामुळे या पिकांचेही नुकसान झालेलेच आहे. पण कोणते निकष लावून ही पिके नुकसनाभरपाईतून वगळण्यात आली आहेत असा प्रश्न शेतकरी आता उपस्थित करीत आहेत.
सोयाबीनप्रमाणेच खरीप हंगामातील उडीद आणि मूगाचे नुकसान झाले आहे. शिवाय पेरणीनंतर लागलीच शेतकऱ्यांनी इतर पिकांप्रमाणे उडीद आणि मूगाचाही विमा अदा केला होता. मात्र, खरिपातील सोयाबीन, तूर, कापूस, या पिकांच्या नुकसानीपोटी विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. पण उडीद-मूगाचे 100 टक्के नुकसान होऊनही अद्यापपर्यंत नुकसानभरपाई मिळालेली नाही. यासंदर्भात अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारीही नोंदवलेल्या आहेत. मात्र, मदतीबाबत ना कृषी अधिकारी सांगत आहेत ना विमा कंपनी. त्यामुळे शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहे.