लातूर : यंदा खरीप-रब्बी हंगामावर अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. (Kharif Season) खरीप हंगामातील पीके अंतिम टप्प्यात असताना झालेल्या (Heavy Rain) अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर पडलेल्या होत्या. त्यामुळे उत्पादनात घट होणार असाच अंदाज वर्तवला जात होता. मात्र, शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी अनोखीच शक्कल लढवली आहे. ऊस लागवडीनंतर आता आंतरपिकातून शेतकरी उत्पादनात भर घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. यंदा प्रथमच ऊसामध्ये (Intercrop) आंतरपिक म्हणून सोयाबीनचा प्रयोग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे खरीप हंगामात झालेले नुकसान भरुन काढण्याचा प्रयत्न मराठवाड्यातील शेतकरी करीत असताना दिसत आहेत. तंत्रशुध्दपध्दतीने आंतरपिक म्हणून सोयाबीनचा पेरा केला जात आहे.
उन्हाळी सोयाबीन हा प्रकार खरीप हंगामातील बियाणापुरताच मर्यादित होता. मात्र, यंदा लांबणीवर पडलेल्या पेरण्या आणि सोयाबीनसाठी पोषक वातावरण यामुळे क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. ऊस हे नगदी पीक तर सोयाबीन हे हंगामी पीक असा मेळ शेतकऱ्यांनी घातलेला आहे. त्यामुळे उत्पादनात तर वाढ होणारच आहे. शिवाय खरिपात सोयाबीनचे झालेले नुकसान भरुन काढण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. सध्या ऊस तोडणी झालेल्या क्षेत्रात उन्हाळी सोयाबीनचेही उत्पादन मिळेल याच पध्दतीने नियोजन केले जात आहे. ऊसाच्या सरीमध्ये मशागत करुन आंतरपिक घेण्यासाठी यंत्राद्वारे मशागत करुन सोयाबीनचा पेरा केला जात आहे.
गतवर्षी लागवड केलेला ऊसाचे गाळप झाले आहे. त्यामुळे या क्षेत्रावर पुन्हा ऊस लागवड केली जात आहे. अधिकच्या पावसामुळे ऊस लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. शिवाय सिंचनाचाही प्रश्न मिटलेला आहे. मात्र, केवळ ऊसामधूनच नाही तर आंतरपिकातूनही उत्पादन वाढीचा प्रयत्न केला जात आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात रुंद सरी, वरंबा पध्दतीने ऊसाची लागवड केली जात आहे. त्यामुळे दोन्ही सरीच्यामध्ये आंतरपीक म्हणून उन्हाळी सोयाबीनचा पेरा केला जात आहे. रब्बी हंगामात हरभरा पिकाचा पेरा अधिकचा असला तरी सध्या वातावरणात बदल झाला आहे. थंडीही कमी झाली आहे. हे वातावरण हरभरासाठी नाही तर उन्हाळी सोयाबीनसाठी पोषक असल्याने हा बदल होत असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांनी रुंद आणि सरी वरंबा पध्दतीने ऊसाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे ऊसाच्या दोन सऱ्यांमध्ये 7 ते 8 फुटाचे अंतर असल्याने ऊसाच्या सऱ्यांमध्ये मशागतीचे काम सुरु आहे. तर काही क्षेत्रामध्ये सोयाबीनचा पेरा झाला आहे. मशागतीबरोबरच पेरणी सहज शक्य असल्याने सोयाबीनचा पेरा केला जात आहे. आता हरभरा पिकाची पेरणी योग्य नाही त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. त्यामुळे सोयाबीन क्षेत्रात वाढ होत आहे. त्यामुळे ऊसाबरोबर सोयाबीमुळे यंदा उत्पादनात वाढ होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.