सांगली : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात द्राक्ष. डाळिंब आणि भाजीपाला या पिकासह तब्बल बारा हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे कृषी क्षेत्रात जवळपास साडेतीन हजार कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली जात आहे.
समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी रात्रीपासून सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाने जिल्ह्यातील काढणीला आलेली आणि फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. बागांमध्ये पाणी साचले असून मण्यांना तडे जाऊन द्राक्षांचे घड कुजण्याच्या स्थितीत आहेत. तसेच रब्बीच्या पिकांसह भाजीपाल्यांचे हे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाच्या दणक्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील 384 गावामध्ये अतिवृष्टी बाधित झाली आहेत. जिल्ह्यात तब्बल बारा हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसामुळे फटका बसलाय. यामध्ये 10 हजार 639 हेक्टर द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. डाळिंब पिकाच्या 343 हेक्टर बागेचे नुकसान झाले आहे. तसेच यामध्ये मका, ज्वारी, हरभरा, आणि भाजीपाला याचा देखील समावेश आहे.
जिल्ह्यात 79 हजार 440 हेक्टर इतके द्राक्षाचे क्षेत्र आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम महिना दीड महिना उशिरानेच सुरू झाला आहे. हंगामाच्या पहिल्या टप्प्यातच आक्टोबरमध्ये अवकाळीने दणका दिल्याने जवळपास 25 टक्के बागा वाया गेल्या होत्या. उरल्यासुरल्या बागांपैकी आणखी 30 ते 35 टक्के बागा परवाच्या अवकाळी दणक्यात धारातीर्थी पडल्या आहेत. जिल्ह्यात द्राक्ष हंगामाचे अर्थकारण जवळपास पाच हजार कोटी रुपयांचे आहे. त्यापैकी जवळपास तीन हजार कोटी रुपयांवर दोन तीनवेळच्या अवकाळीने पाणी फिरविले आहे. उरलेल्या द्राक्ष बागांचा काही भरोसा राहिलेला नाही.
तसेच जिल्ह्यात यंदा 1 लाख 22 हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. जवळपास एक कोटी टन इतका विक्रमी ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. या सगळ्या उसाचे गाळप करणे हे यंदा साखर कारखान्यांपुढे आव्हान आहे. सप्टेंबर, आक्टोबरमधील अवकाळीमुळे आधीच हंगाम लांबलेला आहे. तशातच परवा झालेल्या मुसळधार अवकाळीमुळे जिल्ह्यातील बहुतांश भागातील ऊसतोडी ठप्प झाल्या आहेत. उसाच्या फडांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे आणखी आठवडाभर तरी हंगाम नव्या जोमाने सुरू होऊ शकत नाही. परिणामी, साखर हंगाम लांबून त्याचा शेतकऱ्यांना किमान 500 कोटी रुपयांचा दणका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
इतर बातम्या :