सोलापूर : (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला तरी राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे. सोलापुरात मात्र, वेगळ्याच कारणासाठी ऊस उत्पादक (Farmer) शेतकरी आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील जय हिंद शुगर या साखर कारखान्याने 2019-20 मधील (Pending Cane Bill) उसाची थकित रक्कम अद्यापही दिली नाही. अनेक वेळा मागणी करुनही हक्काचे पैसे न मिळाल्याने अखेर शेतकऱ्यांनी गोकूळ शुगरचे गाळपच बंद पाडले. संतप्त शेतकऱ्यांनी वजन काटा आणि क्रेन बंद करीत आंदोलन केले. एवढेच नाही तर थकीत बील आठवड्याभरात दिले नाही तर आत्मदहनाचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांची आक्रमकता पाहूव कारखाना प्रशासनाची भंबेरीच उडाली. उसाचे गाळप वाढण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळे आश्वासन देण्यात आले होते. पण त्याची पूर्तता तर सोडाच पण उसाचे बील देण्याकडे कारखान्याने दुर्लक्ष केले आहे.
गत दोन वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला लाखो टन ऊस जय हिंद कारखान्याला गळपासाठी पाठवला होता. 2019 साली साखर कारखान्यामध्ये स्पर्धा होती त्यामुळे अनेक कारखान्याने एफआरपी पेक्षा वाजवी दर देण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे जय हिंद शुगरने सुद्धा एफआरपीपेक्षा जास्त म्हणजे 2511 रुपये प्रति टन दर देण्याचे आश्वासन दिले होते. वाढीव दराकडे पाहून शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याकडे नेला. यापैकी काही शेतकऱ्यांना अश्वासनाप्रमाणे 2511 रुपये तर 600 शेतकऱ्यांना 2238 रुपये दर दिला. उर्वरित 273 रुपये रक्कम शेतकऱ्यांना देणे गरजेचे असतानाही जय हिंद कारखान्याने जाणीवपूर्वक हे बील थकवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी थकीत बिलाच्या अनुशंगाने कारखाना आणि पोलीस प्रशासनास लेखी निवेदन देत कळवले होते. त्याचबरोबर जय हिंदच्या विरोधात आजवर पाच वेळा उपोषण आणि आंदोलने ही केले मात्र याचा काहीच परिमाण झाला नाही. दोन वर्षे कोरोनाचा काळ असल्याने शासनाच्या नियमानुसार जमाव बंदीचा आदेश होता. त्यामुळे हे पीडित शेतकरी एकत्रित येऊन आंदोलन करू शकत नव्हते. या काळात शेतकरी स्वतः कारखाना प्रशासनाला थकीत रक्कमेची मागणी करत होते. पण कारखाना वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेत असे. थकीत रकमेबद्दल विचारले असता प्रशासनाकडून केवळ खोटी आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.
शेतकऱ्यांनी थकीत बिलासाठी थेट कारखान्याचे गाळपच बंद केले. यापूर्वी अनेक वेळा आंदोलने करुनही प्रश्न मार्गी लागत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जय हिंद साखर कारखान्याचा वजन काटा बंद करत क्रेनही बंद पाडले. शेतकऱ्यांचा आक्रमकपणा पाहून कारखाना प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शिवाय आठ दिवसांमध्ये थकीत बिलाचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. आश्वासनाची पूर्तता न झाल्यास कारखान्यातच आत्मदहन केले जाणार असल्याचा इशारा परमेश्वर यादवाड, सैफन पटेल, श्रीकांत वसुरे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे.
Pocra : मराठवाडा अन् विदर्भासाठी ‘पोकरा’ ठरली वरदान, योजनेचा 56 टक्के निधी खर्च
Jalna : खरीप बियाणांची चिंता नाही, रासायनिक खतांचे काय ? जिल्हा प्रशासन लागले कामाला