जळगाव : फरदड (Cotton crop) कापसाचे उत्पादन हे धोक्याचेच आहे. केवळ काही रकमेसाठी याचे उत्पादन म्हणजे आगामी हंगामातील पिकांचेही नुकसानच. अशा प्रकारे अनेक वेळा कृषी विभागाने सांगूनही शेतरकऱ्यांनी फरदड कापसावर भर दिला होता. मात्र, वातावरणातील बदल आणि कापसाचे घटत असलेले दर यामुळे त्रासलेल्या शेतकऱ्यांनी अखेर फरदड मोडून इतर पिकांचा पर्याय शोधला आहे. बोंडापेक्षा बोंडअळीचाच अधिकचा प्रकोप होत असल्याने बोंडेही उमलत नव्हती. शिवाय (loss of agriculture sector) रिकामे क्षेत्र राहिल्याने नुकसान होणार ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षातत आल्याने आता वेगळा पर्याय शोधला जात आहे. फरदड कापसाच्या क्षेत्रावर शेतकरी आता बाजरी, गव्हाचे उत्पादन घेत आहेत.
कापूस वेचणी झाल्यानंतर अधिकच्या उत्पादनाच्या दृष्टीने नोव्हेंबरनंतरही कापूस वावरातच ठेऊन शेतकऱ्यांना उत्पादनाची अपेक्षा होती. शिवाय यंदा हंगामाच्या सुरवातीला चांगला दरही होता. त्यामुळे पुन्हा पेरणी करुन अधिकचा खर्च करण्यापेक्षा फरदड कापूसच वावरात ठेऊन उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वातावरणातील बदलामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव हा वाढतच असल्याने अखेर फरदडची मोडणी करण्याचा निर्णय खानदेशातील शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. शिवाय या पीकामुळे शेतजमिनीचेही नुकसान होणार होते. याबाबत कृषी विभागाने वेळोवेळी मार्गदर्शनही केले होते. मात्र, गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांनी कापूस हा शेतातच ठेवला होता. पण नुकसान लक्षात आल्यानंतर मोडणी सुरु झाली आहे.
केवळ खानदेशामध्ये 9 लाख हेक्टरावर कापसाची लागवड केली जाते. यंदा उत्पादनात मोठी घट झाल्याने हंगामाच्या सुरवातीला कापसाला 9 हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाले होते. पण आता कापसाचे दरही घसरले आहेत. शिवाय बोंडअळीचा प्रादुर्भाव दिवसागणिस वाढत असल्याने भविष्यात शेतजमिन ही नापिकी होण्याचा धोका आहे. त्यामुळे त्याची काढणी करुन या क्षेत्रावर बाजरी किंवा गव्हाचे उत्पादन घेतले जात आहे. यंदा गव्हासाठी पोषक वातावरण मानले जात असून मूबलक प्रमाणात पाणीही आहे. उत्पादनवाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी फरदडची मोडणी केली आहे.
सध्या वातावरणातील बदलामुळे कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच कापूस शेतामध्ये कायम ठेवला तर अळीचा प्रादुर्भाव हा वाढणारच आहे. एवढेच नाही तर फरदड कापसाचा शेत जमिनीवरही परिणाम होत असतो. आगामी वर्षात उगवण क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. तर आता रब्बी हंगामातील पिकांची उगवण झाली आहे. या फरदड कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव इतर पिकांवर होण्याचा धोका आहे. त्यामुळे तात्पूरत्या फायद्यासाठी शेतकऱ्यांनी आगामी हंगामातील आणि शेतजमिनीचे नुकसान करुन घेऊ नये असा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.