लातूर : सोयाबीनचे ( Soybean) दर आणि बाजारपेठेत होणारी आवक हा हंगामाच्या सुरवातीपासूनचा मुद्दा आजही चर्चेत आहे. दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन (, Arrivals Decreased) आवक वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण आवक ही कमीच होताना दिसत आहे. तर सोयाबीनचे दर हे स्थिर आहेत. पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला 11 हजाराचा दर मिळाला होता. त्यामुळे सोयाबीनच्या दराला घेऊन शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे सध्या 5 हजाराचा दर असतानाही बाजारपेठेत सोयाबीनची आवक ही कमी होत आहे.
सोयाबीन खरीप हंगामातील नगदी पीक आहे. शिवाय मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे हे मुख्य पीक आहे. मात्र, यंदा निसर्गाची अवकृपा राहिल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झालेली आहे. तर पावसामुळे दर्जाही खालावलेला आहे. असे असतानाही सोयाबीनला किमान 8 हजाराचा दर मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे सरकारच्या धोरणामुळेही सोयाबीनच्या दरात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. मात्र, अपेक्षित दर नसल्यानेच शेतकरी सोयाबीन साठवणूकीवरच भर देत आहे.
दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात वाढ होईल असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र, दिवाळी होऊन पाच दिवस उलटले मात्र, सोयाबीनच्या दरात वाढ नाही पण दर हे स्थिर आहेत. गेल्या 4 दिवसांपासून लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 5 हजाराचा दर मिळालेला आहे तर बुधवारी केवळ 8 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. अधिकचे दर मिळतील या आशेवर शेतकरी सोयाबीनची साठवणूक करीत आहेत. मात्र, मागणी नसल्याने उठाव नसल्याचे व्यापारी अशोक आग्रवाल यांनी सांगितले. शिवाय गतवर्षीही हाच दर होता. आता हंगामाच्या सुरवातीला मुहूर्ताच्या दरावरुन शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत म्हणून आवक ही कमी आहे.
खाद्य तेलाच्या दरावर नियंत्रण यावे म्हणून कडधान्याच्या साठ्यावर केंद्र सरकारने बंदी घातली हेती. त्यामुळे कडधान्यांचा साठा हा व्यापाऱ्यांना करता येत नव्हता. या निर्णयामुळे तेलाच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे. 31ऑक्टोंबरपर्यंत व्यापाऱ्यांना साठा मर्यादेची मुदत ठरवून दिली होती. त्या मुदतीचा कालावधी आता संपलेला आहे. असे असतानाही व्यापारी हे साठवणूक करीत नाहीत. साठवणूक न केल्याने सोयाबीनच्या मागणीत घट होत असल्यानेच दर हे स्थिर आहे.
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. बुधवारी लाल तूर- 6062 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6100 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6054 रुपये क्विंटल, जानकी चना 4950 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4800, सोयाबीन 5400, चमकी मूग 7200, मिल मूग 6300 तर उडीदाचा दर 7031एवढा राहिला होता.
थंडी वाढताच लाळ्या-खुरकूताचा प्रादुर्भाव ; दूध उत्पादनावरही परिणाम, अशी घ्या जनावरांची काळजी
उच्चांकी दर असतानाही कापसाची मोडणी, काय आहेत कारणे?