उमेश पारीक, निफाड : कृषी प्रधान निफाड (nashik nifad) तालुक्यातील शेतकरी (farmer) दुहेरी संकटात सापडला आहे. बिबट्यांची संख्या (leopard number) अधिक वाढली आहे. त्यामुळे बिबट्याचा मुक्त संचार शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे. मोकाट जनावरांबरोबर मानवावर वारंवार हल्ले होत आहेत, तर दुसरीकडे रात्री मिळणाऱ्या लाईटमुळे शेतीला पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागते. बिबट्यांच्या भीतीमुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. वनविभागाने पिंजऱ्यांची संख्या वाढवत निफाड तालुक्यातील गावे बिबटमुक्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे द्राक्ष बागेच्या कामावरून शेतमजूर परत येत असताना आई-वडिलांच्या देखत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत सात वर्षाच्या चिमुकल्याला उचलून नेत मक्याच्या शेतात ठार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर मादी बिबट्याला जेरबंद करण्यात आले, पण त्या ठिकाणी बिबट्याचे कुटुंब राहत आहे. नर बिबट्या आणि दोन बछडे असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून येथील स्थानिक शेतकरी शेतात काम करण्यासाठी दिवसा जाण्यास घाबरत आहेत अशी माहिती दत्तू शिवराम मुरकुटे यांनी दिली.
तर लोडशेडिंग मुळे रात्रीची लाईट मिळत असल्याने शेतीला पाणी द्यावे कसे सर्व शेतीची कामे ठप्प होत असल्याने या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात पिंजरे लावावे तसेच दिवसा लाईट द्यावी अशी मागणी येथील स्थानिक शेतकरी सह त्यांचे कुटुंबीय करत असल्याचं रामनाथ माधव मुरकुटे यांनी दिली आहे.
निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्यांच्या भीतीमुळे अक्षरशः शेतात काम करायला जाण्यासाठी जोडीला कोणीतरी असल्याशिवाय कोणी जात नाही. चार-पाच लोक शेतात काम करीत असले तरंच लोकं शेतात कामासाठी जात आहेत. वन विभागाने या ठिकठिकाणी जास्तीत जास्त पिंजरे लावावे व बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी कविता संजय मुरकुटे यांनी केली आहे.