जालना : हंगामाच्या सुरवातीपासूनच पिकांवर नैसर्गिक संकट ओढावले ते काढणीपर्यंतही कायम राहिले आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा सोयाबीन पिकाला बसला होता. त्यामुळे उत्पादनात तर घट झालीच पण दर्जा ढासळल्याने दरावरही परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे बहरात असलेली तुरही अंतिम टप्प्यात अळीच्या कचाट्यात सापडलेली आहे. त्यामुळे अधिकचे उत्पादन तर सोडाच पण शेतकऱ्यांनी केलेला खर्चही पदरी पडलेला नाही. आता तुरीच्या काढणीच्या प्रसंगीच अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्यामुळे शेवटच्या पिकातून मिळणाऱ्या उत्पादनाच्या आशा देखील मावळलेल्या आहेत.
खरिपातील केवळ तूर पिक हे बहरात होते. अतिवृष्टीचा देखील तुरीवर परिणाम झालेला नव्हता. त्यामुळे सोयाबीनमधून नुकसान झाले तरी तुरीतून ते भरुन निघणार असा शेतकऱ्यांना आशावाद होता. पण काढणी काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे या अखेरच्या पिकावर देखील मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे कळी आणि फुलोऱ्यात असलेल्या तुरीचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. खरिपातील नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
तुरीवर अळीचा प्रादुर्भाव असेल तर निंबोळी अर्क 5 टक्के, अझाडिरॅकटीन 300 पीपीएम 50 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे. त्यानंतर शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना शेंगा पोखरणारी अळी आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के एसजी हे कीटकनाशक 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात दुसरी फवारणी करावी लागणार आहे. त्यानंतरच अळी अटोक्यात येऊन उत्पादनात वाढ होणार आहे.
हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनचे दर हे कमी होते. मात्र, उत्पादन कमी असूनही दर खालावल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करण्यापेक्षा साठवणूकीवर भर दिला. त्यामुळे का होईना दिवाळीनंतर सोयाबीनचे दर वाढले अन् शेतकऱ्यांना फायदा झाला मात्र, आता पुन्हा सोयाबीनच्या दरात मोठी घट होत आहे. दर वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली आहे. मात्र, केंद्र सरकारचे धोरण आणि घटती मागणी यामुळे साठवलेल्या सोयाबीनला दर मिळेल का नाही याबाबत साशंका उपस्थित केली जात आहे. सोयाबीनप्रमाणेच कापूस साठणूक केली जात आहे. हंगामाच्या सुरवातीला कापसाला 9 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर होता मात्र, आता आवक वाढूनही दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापसाचीही साठवणूक करण्यास सुरवात केली आहे. परंतू, दराबाबत सर्वकाही अलबेलच आहे.