लातूर : शेतामध्ये काम करीत असताना अपघात होण्याचा धोका हा कायम असतो. अंगावर वीज पडणे, पूरस्थिती, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचा अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पादनाचे साधनच बंद होते. त्यामुळे अपघातामध्ये मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास (Gopinath Munde Kisan Accident Insurance Scheme) गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे आर्थिक मदत ही या योजनेतून केले जाते. सहा महिन्यापुर्वी ज्या शेतकऱ्याचा अपघात झाला आहे. त्याचे नावे शेतजमिन असणे आवश्यक होते मात्र, या नियमात बदल करुन आता शेतकरी कुटुंबातील कुण्याही सदस्याच्या नावावर शेतजमिन असली तरी या योजनेचा लाभ घेता येणार आहे…जाणून घेऊ या अपघात विमा योजनेचा उद्देश सहभाग होण्याची प्रक्रिया..
शेतामध्ये काम करीत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये अपघात होण्याचाही धोका संभावतो. मात्र, या दुर्घटनेत शेतकऱ्याचा मृत्यू झाला किंवा त्यास अपंगत्व आले तर कुटुंबाचे उत्पादनाचे साधनच बंद होते. त्यामुळे अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा म्हणून 1 डिसेंबर 2016 रोजी ही अपघात विमा योजना सुरु करण्यात आली आहे. यामाध्यमातून शेतकरी कुटुंबास 2 लाखापर्यंत निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत आहे.
विमा संरक्षण असताना रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, हिस्त्र जनावरांनी खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामळे जखमी होणे किंवा मृत्यू व अन्य कोणतेही अपघातांचा समावेश करण्यात आला आहे.
नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थांच्या नशेत असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, बाळंतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी यांचा विमा संरक्षणात समावेश नाही.
राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकऱ्यांचा विमा हफ्ता शासनामार्फत भरण्यात आला असून दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. विम्याचा लाभ हा 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्यालाच मिळणार आहे. यापुर्वी ज्याचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचा सातबारा असणे आवश्यक होते. मात्र, यामध्ये बदल करुन जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे शेतजमिन असली तरी सहभागी होता येणार आहे.
अपघात झाल्यास पोलिस पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, सातबारा, आठ ‘अ’, 6 क, 6 ड, मृत्यृ प्रमाणपत्र, ज्यांचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचे वारसा प्रमाणपत्र, वारसा अर्जदार इत्यादी कागदपत्रे ही कृषी विभागात जमा करावी लागतात. कृषी विभाग नियुक्त केलेल्या विमा कंपनीकडे या कागदपत्रांची पूर्तता करतात. त्यानंतर योग्य ती चौकशी होऊन संबंधित शेतकऱ्यास किंवा शेतकरी कुटुंबास विमा रक्कम ही अदा केली जाते.
अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाले असतील तर दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे. तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे. (Gopinath Munde changes farmer accident insurance scheme, gets financial assistance after accident)
विदर्भातील महामंडळाच्या गोदामात 24 लाख क्विंटल धान्य पडून, राज्य-केंद्राच्या वादात धान्याचे नुकसान
सोयाबीनच्या काढणीला वेग ; दराचे भवितव्य अंधारात, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?
पालघर शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : वाडा कोलम तांदळाला भौगोलिक मानांकन, जागतिक बाजारपेठेतही मागणी