कांदा स्वस्त होणार… अखेर केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; बळीराजाची दिवाळी

| Updated on: Oct 29, 2023 | 12:43 PM

Onion Price : अखेर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक, शेतकऱ्यांनी सातत्याने लावून धरलेल्या आंदोलनामुळे राज्य सरकार बॅकफूटवर आलं आहे. राज्यातील आणि देशभरातील विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध केला होता. त्यानंतर या सरकारने कांदा निर्यात शुल्काबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. तसा जीआरच काढला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

कांदा स्वस्त होणार... अखेर केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; बळीराजाची दिवाळी
onion price
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

चैतन्य गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 29 ऑक्टोबर 2023 : गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर वारंवार वाढत आहेत. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी 70 ते 80 रुपये किलोने विकला जात आहे. गेल्या आठवड्याभरातच कांद्याची किंमत 15 ते 20 रुपयांनी वाढली आहे. येत्या काळात कांद्याची किंमत 100 रुपयांवर जाणार असल्याची चर्चा आहे. ऐन सणासुदीत कांद्याचे दर वाढणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील 40 टक्के शुल्काचा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदाच होणार आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील 40 टक्के शुल्क रद्द केलं आहे. तसा जीआरच केंद्र सरकारने काढला आहे. डिसेंबर अखेर 800 डॉलर प्रति टन किमान निर्यात शुल्क राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांना कांदा निर्यात करायचा आहे, ते करू शकतात. या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.

कांद्याची आवक वाढवण्यासाठी…

देशातील बाजारांमध्ये कांद्यांची आवक वाढवण्यासाठी आणि कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढल्या होत्या. त्यामुळे सर्वांचं कंबरडं मोडलं होतं. वाढत्या महागाईमुळे गृहिणींचं बजेटही कोलमडलं होतं.

प्रचंड विरोध, आंदोलन

केंद्र सरकारने लावलेल्या निर्यात शुल्काला शेतकरी, कांदा उत्पादकांनी प्रचंड विरोध केला होता. महाराष्ट्रात तर सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात बेमूदत आंदोलन पुकारण्यात आलं होतं. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवून कांदा लिलाव बंद ठेवला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षानेही हे निर्यात शुल्क रद्द करण्याची वारंवार मागणी केली होती.

केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याशीही कांदा उत्पादकांनी वारंवार चर्चा झाली होती. पण त्यातून काहीच तोडगा निघाला नव्हता. निर्यात शुल्काविरोधातील आंदोलन सुरूच होतं. त्यामुळे अखेर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून निर्यात शुल्क रद्द केलं आहे. त्यामुळे आता बाजारातील कांद्याची आवक वाढणार असून कांद्याच्या किंमती स्वस्त होणार आहेत.