सांगली : निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत (Grape Farmer) द्राक्ष उत्पादकांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे. (Unseasonable Rain) अवकाळी, वाढते ऊन यासारख्या समस्यांवर मात करीत द्राक्ष उत्पादकांनी उत्पादन काढलेच. पण यंदा द्राक्षातून शेतकऱ्यांना फायदा होऊच द्यायचा नाही असा निर्धार जणूकाही नियतीनेच केला अशी एकामागून एक संकटे ही सुरुच आहेत. आता काढलेल्या मालातून चार पैसे पदरी पडतील हे निश्चित झाल्यानंतर अगदी अंतिम टप्प्यात द्राक्ष (Grape Trader) दलालकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. तासगाव तालुक्यातील खुजगाव आणि सिद्धेवाडी येथील दहा शेतकर्यांची तब्बल 31 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी चार दलालांवर तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महेश सुभाष पाटील खुजगाव येथील शेतकऱ्याने फिर्याद दिली आहे.
द्राक्ष उत्पादनानंतर बाजारपेठ आणि प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत माल पोहचेपर्यंत दलालांची मोठी साखळीच आहे. फिर्यादी महेश पाटील यांच्या द्राक्षाची खरेदी ही रामा चौगुले, परमेश्वर चौगुले, अमित चव्हाण, अमोल पाटील कवठेमहांकाळ यांनी केली होती. मात्र, संशयित दलालांनी फिर्यादी महेश याची गेल्या हंगामात द्राक्ष खरेदी केली होती. मात्र द्राक्ष नेल्यापासून हे दलाल पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होते. गेल्या काही दिवसांपासून या दलालांनी संपर्कच तोडला होता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महेश यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
या घटनेतील संशयित आरोपींनी सन 2020 मध्येही सिद्धेवाडी येथील राजेंद्र पवार, अरविद दुबोले, पंडित पवार, शामराव चव्हाण, प्रकाश पवार, गुंडा चव्हाण, दिनकर चव्हाण व संतोष जाधव यांची द्राक्षे खरेदी केली होती. द्राक्ष खरेदीनंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली होती. तेव्हाही संबधित व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे फिर्यांदीमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरवर्षी द्राक्ष दलालांकडून द्राक्ष उत्पादकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बाजार समित्या आणि द्राक्ष बागायतदार संघाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये द्राक्ष उत्पादक संघाने एक सौदे पावत्यांची छपाई केली आहे. शिवाय द्राक्ष उत्पादकापर्यंत ती पोहचवली आहे. मात्र, याचा वापर पाहिजे त्या प्रमाणात होत नाही.या पावतीवर शेतकऱ्याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, गट नंबर, आधार नंबर याचा उल्लेख आहे तर खरेदीदाराचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर, पॅक हाऊस पत्ता, पॅन नंबर, परवाना क्रमांक याची माहिती शेतकऱ्यांनी ठेवणे गरजेच आहे. तर सौद्याचे स्वरुपमध्ये द्राक्ष वाणाचे नाव, ठरलेला भाव प्रतिकिलो, द्राक्ष तोडणीची तारीख, गाडी नंबर, वजन, एकूण रक्कम आणि पेमेंट देण्याची तारीख याचा उल्लेख आहे. त्यामुळे अशा स्वरुपाची माहिती भरुनच व्यवहार करण्याचे आवाहन द्राक्ष उत्पादक संघाचे संचालक अॅड. रामनाथ शिंदे यांनी केले आहे.