नवी मुंबई : APMC फळ मार्केटमध्ये द्राक्षाची आवक वाढली आहे. गुरुवारी 25 ते 30 गाड्या द्राक्षाची आवक झाली आहे. मात्र, द्राक्षांच्या दरात चांगलीच घसरण पाहायला मिळत आहे. किलोमागे 40 ते 80 रुपये असलेला दर आज 15 ते 60 रुपयांपर्यंत आला आहे. नाशिक, तासगाव, नारायणगावहून गेल्या 2 दिवसांत द्राक्षाची आवक वाढली आहे. त्यामुळे द्राक्षाचे भाव घसरल्याचं पाहायला मिळत आहे.(Grape prices also fell sharply due to the corona outbreak)
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने नियमावली अधिक कडक केली आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष खरेदीसाठी ग्राहकांची संख्या कमी आहे. त्यात गेल्या दोन दिवसांपासून ग्राहकांच्या संख्येत अजून घट झाल्यामुळे मागणीही घटली आहे. तर दुसरीकडे बाजारपेठेत द्राक्षाची आवक वाढली आहे. यामुळे द्राक्षाच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. भाव घसरल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि मालाला उठाव नसल्यामुळे व्यापारी हैराण झाले आहेत.
द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने याचा थेट परिणाम द्राक्ष निर्यातीवर होत आहे. निर्यातक्षम द्राक्षांना मिळणाऱ्या पैशातून उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाल्याने शेतकऱ्यांनी बेदाणे केले असता त्यालाही मागणी आणि बाजार नसल्यामुळे द्राक्ष उत्पादक संकटात आलेत. कोरोना प्रादुर्भावामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.
2020 मध्ये कोरोनामुळे देशासह विदेशात लॉकडाऊन झाल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षाची मागणी घटली होती. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्षाचे बेदाणे करण्याची वेळ आली होती. आता पुन्हा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावात वाढ झाल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षाची मागणी घटलीय. व्यापाऱ्यांकडून द्राक्षांना मिळणाऱ्या बाजार भावातून उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले आहे.
संबंधित बातम्या :
कोरोनाचा फटका द्राक्ष उत्पादकांना झटका, निर्यातीवरील सबसिडी सुरु करण्याची केंद्राकडे हाक
पारनेरच्या बाळासाहेब गुंजाळ यांनी करुन दाखवलं, तैवान पिंक पेरु शेतीतून 40 लाखांची कमाई
Grape prices also fell sharply due to the corona outbreak