सांगली : ऐकावे ते नवलच. आगोदरच शेतकरी एक ना अनेक समस्यांना सामोरे जात आहे. निसर्गाचा लहरीपणा त्यात बाजारपेठेतील घटते दर हे कमी म्हणून की काय आता हळद उत्पादकांसमोर नविनच समस्या उभी राहिलेली आहे. हळद हा शेतीमाल नसल्याचा दावा महाराष्ट्र अग्रिम अधिनिर्णय प्राधिकरणनाने करून वाळवलेल्या आणि पॉलिश केलेल्या हळदीला जीएसटी सक्तीचा केला आहे. त्यामुळे (Turmeric) हळद हा शेतीमाल नाही हा निर्णय कोणत्या आधारावर घेतला आहे. असा सवाल आता (Sangli Turmeric Market) व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. एवढेच नाही तर व्यापारी आता शेतकऱ्यांच्यावतीने जीएसटी विभागाकडेही अपील करणार आहेत. मात्र, जीएसटी च्या निर्णयामुळे हळदीचा रंग हा बेरंग होणार आहे.
दोन वर्षांपासून हळद हा शेतीमाल असल्याबाबतचा वाद सुरू होता. मात्र अखेर महाराष्ट्र अग्रिम अधिनिर्णय प्राधिकरणनाने हळद शेतीमाल नसल्याचा निवाडा केला आहे. त्यामुळे हळदीला अखेर 5 टक्के जीएसटी लागू केला आहे. वाळवलेल्या आणि पॉलिश हळदीला जीएसटी सक्तीचा राहील. हळदीच्या अडतदारांना मिळणाऱ्या कमिशनवरही जीएसटी भरावा लागणार असल्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हळद व्यापाऱ्यांना सेवा कर भरण्याबाबत दिलेल्या नोटिसा कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा निर्णय अन्यायकारक आहे. या निर्णयामुळे व्यापारी तर अडचणीत येतीलच पण हळदीचे दरही घसरतील याची धास्ती शेतकऱ्यांना आहे.
हळद हे शेतीमालच असल्याचे नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, संबंधित विभागाने कोणते निष्कर्ष काढून हा शेतीमाल नसल्याचे सांगण्यात असा प्रश्न येथील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनाही पडलेला आहे. गेल्या 2 वर्षापासून याबाबत लढा सुरु असून आता शेतकऱ्यांच्या विरोधाच निर्णय झाला आहे. हळद शेतीमालच आहे. हळद शिजवणे आणि वाळवणे ही उद्योगातील प्रक्रिया नाही.हे सर्व शेतकरीच करत असतो. त्यामुळे हळद हा शेतीमाल नसल्याच्या निर्णयाविरोधात कृषी उत्पन्न बाजार समिती व शेतकऱ्यांच्या वतीने जीएसटी विभागाकडे अपील केले जाणार असल्याचे सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितले आहे.
सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेतले जाते. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निजामुद्दीन, शेलम अशा बाहेरच्या राज्यातून हळदीची आवक होत असते. हळद ही गुणकारी आहे. त्यामुळे विशेष महत्व आहे. विक्री आणि खरेदीसाठीही व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आतापर्यंत सर्वकाही सुरळीत असताना हळदीच्या दरावर या सर्व बाबींचा परिणाम होणार आहे. सध्या तो जाणवत नसला तरी भविष्यात मात्र, काय होईल हे सांगता येत नाही.