लातूर : खरीप हंगामात पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले असले तरी रब्बी हंगामातील पोषक वातावरणाचा फायदा शेतकरी घेऊ लागले आहेत. यंदा (summer season) उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे. उन्हाळी ( Seed processing) सोयाबीनचा सर्रास वापर हा खरीप हंगामातील बियाणासाठी केला जातो. मात्र, हे करीत असताना एक विशिष्ट प्रक्रिया आहे त्याचे अनुकरण केले तरच विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शिफरशीनुसार बियाणांची उपवब्धी होणार आहे. तर दुसरीकडे रब्बी हंगामातील ज्वारी, मका, हरभरा याचा पेरा पूर्ण झाला असून या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे बिजप्रक्रिया आणि लष्करीअळीचे व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती घेणार आहोत..
आता उन्हाळी सोयाबीन हे आगामी खरीप हंगामात बियाणांसाठीच उत्पादन घेतले जाते. मात्र, याकरिता शेतकऱ्यांनी महाबीजकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. शिवाय शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन घेतले आणि उत्पादीत बियाणांची विक्री ही महाबिजकडेच केली तर बाजारभावापेक्षा अधिकचा दर दिला जाणार आहे. त्यामुळे पोषक वातावरणामुळे वाढणारी उत्पादकता आणि मिळणारा दर यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचा विश्वास महाबिजकडून व्यक्त केला जात आहे.
पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवर पडलेला आहे. त्यामुळे आता उन्हाळी सोयाबीनचा पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. 15 डिसेंबर ते 15 जानेवारी या महिन्यात उन्हाळी सोयाबीनचा पेरा केला तर फायद्याचे राहणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. पेरणीपूर्वी बियाणास 3 ग्रॅम कार्बोक्सीन अधिक थायरम 37.5 टक्के किंवा पेनफ्लुफेन 13.28 टक्के, 1 मिली किंवा थायोफिनेट मिथाईल अधिक पायराक्लोस्ट्रोबिन 3 मिली प्रति किलो बियाणे या बुरशीनाशकाची फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे पेरणीनंतर सोयाबीन बहरात येईपर्यंत कोणत्या कीडीचा प्रादुर्भाव होणार नाही.
रब्बी हंगामातील मका आणि ज्वारी ही पोषक वातावरणामुळे बहरात आहेत. मात्र, मध्यंतरीच्या वातावरणामुळे लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के, एसजी ग्रॅम 6 किंवा थायमिथॅाक्झाम 12.6 टक्के अधिक लॅमडा साहलोथ्रीन 9.5 टक्के झेडसी संयुक्त कीटकनाशक 5 मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5 टक्के एससी, 4 मिली किंवा स्पायनोटोरम 11.7 एस सी, 5 प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे.