नंदुरबार : निसर्गातील लहरीपणाचा फटका सर्वच पिकांवर होत आहे. यामधून भाजीपाल्याचीही सुटका झाली नाही. गेल्या पाच वर्षापासून उत्पादनात घट होत असल्याने आता मिरचीचे मुख्या आगार समजले जाणाऱ्या नंदुरबारमध्ये देखील क्षेत्र कमी झाले आहे. हंगामातील मिरची आवकला सुरवात झाली असल्याने येथील बाजारपेठेत दिवसाकाठी 3 हजार क्विंटल मिरचीची आवक होत आहे. तर लाल मिरचीला 2 ते 2 हजार 500 रुपये पर्यंत प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आवक सुरु झाल्याने येथीव बाजारपेठ लाल गालिचाप्रमाणे दिसत आहे.
हंगामातील मिरचीची आवक बाजारपेठेत सुरु झाली आहे. मात्र, दरवर्षीपेक्षा यंदा आवक कमी होणार असल्याचा अंदाज आहे. कारण मिरचीमधून अधिकचा तोटा होत असल्याने शेतकरी मिरची लागवडीके दुर्लक्ष करीत आहे. मात्र, हंगामाच्या सुरवातीला काही दिवस आवक राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नंदुरबार बाजारपेठ मिरचीचे आगार म्हणून ओळखले जाते. येथील मिरचीची ख्याती सातासमुद्रापार गेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मिरचीचे उत्पादन जिल्ह्यात घेतले जाते. दरवर्षी दहा हजार एकरपेक्षा जास्त लागवड मिरचीची होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नव्याने लागवड होणाऱ्या क्षेत्रात घट होत आहे. गुजरात सीमेवरील शेतकरीही येथे मिरची विक्रीसाठी आणतात. स्थानिक मिरची उत्पादनामुळे खासगी मिरची प्रक्रिया उद्योगही मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत.
नैसर्गिक असमतोलामुळे कमी झालेले पर्जन्यमान असो की उत्पादनाच्या तुलनेत होणारा खर्च हे सर्व पाहता मिरचीचे उत्पादन शेतकऱ्यांना परवडत नाही. यामुळे मागील पाच वर्षांत शेतकऱ्यांना मिरची उत्पादनात मोठा फटका बसला आहे. त्याचाच परिणाम, मिरची लागवडीवर होत आहे. दहा ते 50 एकर केवळ मिरचीचे उत्पादन घेणारे शेतकरी आता केवळ एक ते 20 एकरवर आले आहे. उत्पादनात शेतकऱ्यांनी आता बदल केला असून मिरची ऐवजी ऊस, केळी, पपई या नगदी पिकांकडे शेतकरी वळले आहेत. त्यामुळे कधीकाळी रोज 30 हजार क्विंटल मिरचीची होणारी आवक आता थेट 3 हजार क्विंटलवर आली आहे.
यंदा मिरचीला सुरवातीपासूनच चांगला भाव मिळत आहे. सध्या व्हीएनआर, जरेला, फापडा आदी प्रकारच्या मिरच्याची बाजारपेठेत आवक होत आहे. सुमारे अडीच ते तीन हजार क्विंटल मिरची बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. मिरचीला 2 हजार ते 2600 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळत आहेत. परराज्यातील व्यापाऱ्यांही मिरची खरेदी करीत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये मिरची खरेदीसाठी स्पर्धा सुरू झाल्याने किमान तेवढा भाव मिळत आहे, अन्यथा पाचशे ते हजार रुपये क्विंटल मिरचीचे मातीमोल दर शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी मिळाले होते. त्यात खर्चही निघाला नव्हता.
मराठवाड्यात कापसाचे क्षेत्रही घटले अन् उत्पादनही, काय आहेत कारणे..?
गरोदर गायीसाठी डोहाळजेवण आंध्रप्रदेशात जोपासली जातेय परंपरा
प्रक्रियेतच अडकली 5 लाख शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम, नेमकी काय आहे अडचण?