लातूर : गेल्या वर्षभरात हंगाम सुरु झाल्यापासून सोयाबीन चर्चेत राहिले ते दरावरुन आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे. उत्पादनात घट झाली सर्वकाही अवलंबून होते ते दरावर. मात्र, बाजारात (Soybean prices) सोयाबीन दाखल होताच झालेला बदल शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागणाराच होता. यावरही (Farmer) शेतकऱ्यांनी मात केली तो संयम राखून. आताही तशीच वेळ आहे. डिसेंबरच्या सुरवातीला आणि अखेरीस सोयाबीनचे दर हे घसरलेलेच होते. पण आता नववर्षात पुन्हा सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. त्यामुळे सोयाबीनचा दर कायम टिकवून ठेवायचा असेल तर शेतकऱ्यांनीही सोयाबीनची विक्री ही टप्प्याटप्प्याने करणे गरजेचे आहे. सध्या मोठ्या प्रमाणात आवक नाही म्हणूनच अधिकचे दर असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
हंगामाच्या सुरवातीपासूनच शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करण्यास सुरवात केली होती. दरात घट झाली की सोयाबीनची साठवणूक हाच एकसुत्री कार्यक्रम शेतकऱ्यांनी राबलेला आहे. त्यामुळे दरही टिकून राहिले आणि अजूनही 40 टक्के सोयाबीन शेतकऱ्यांकडेच आहे. आतापर्यंत बाजारभावानुसार सोयाबीनची आवक आणि सर्वकाही ठरत होते. पण आता शेतकऱ्यांचीही भूमिका महत्वाची राहत आहे. दरात कमी-अधिक झाले तरी आवक न वाढल्याने पुन्हा मागणी वाढली आणि बाजारपेठेत सोयाबीन कायम चर्चेत राहिले आहे. आता गेल्या दोन दिवसांपासून 6 हजार 300 वर स्थिरावले आहे. शिवाय नविन वर्षात सोयाबीनचे दरात मोठी वाढ झाली नाही तरी घट होणार नसल्याचे तज्ञांनी सांगितलेले आहे.
खरीप हंगामात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकरी आता उन्हाळी सोयाबीनचा पर्याय समोर करीत आहेत. राज्यात तब्बल 2 लाख हेक्टरावर उन्हाळी सोयाबीन होईल असा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे. याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांनी केवळ साठवूकच न करता टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री ही सुरुच ठेवावी लागणार आहे. कारण अचानक आवक वाढली तर त्याचा परिणाम थेट दरावर होणार आहे. गेल्या वर्षी सर्वात कमी 4 हजार 300 रुपये तर सर्वधिक दर हा 7 हजार 200 वर गेला होता. त्यामुळे नववर्षाची सुरवात तर चांगली झाली आहे. भविष्यात काय दर राहणार हे पहावे लागणार आहे.
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. सोमवारी लाल तूर- 5900 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6000 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6200 रुपये क्विंटल, जानकी चना 4570 रुपये क्विंटल, विजय चणा 4570, चना मिल 4400, सोयाबीन 6390, चमकी मूग 6800, मिल मूग 6000 तर उडीदाचा दर 7000 एवढा राहिला होता.