लातूर : आठवड्याच्या सुरवातीपासून सोयाबीनच्या दरात घट होत होती. यामध्येच वायदा बंदीचा निर्णय यामुळे सोयाबीनचे नेमके काय होणार हा प्रश्न कायम आहे. यातच शेतकऱ्यांनी हंगामाच्या सुरवातीपासून विक्रीपेक्षा साठवणूकीलाच अधिकचे महत्व दिलेले आहे. त्यामुळे सरकारचे निर्णय आणि शेतकऱ्यांकडील साठवणूक यामुळे दरात कमालीची घसरण होणार असेच वातावरण तयार झाले आहे. मात्र, शुक्रवारी सोयाबीनच्या दरात 200 रुपयांची वाढ झाल्याने दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे आता बदलत्या व्यवस्थेबरोबर शेतकऱ्यांनीही बाजारपेठेचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे दर वाढतील असे चित्र सध्या बाजारपेठेतले नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये आहे.
सोयाबीनसह इतर आठ शेतीमालावरील वायदेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात शेतीमालाचे काय दर राहणार याचा अंदाज देखील काढता येणार नाही. शिवाय शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेले वायद्यांचा अधिकचा लाभ हे व्यापारी आणि आडतेच घेऊ लागले आहेत. मात्र, आता शेतीमालाच्या बाजारपेठेतील व्यवस्था ही बदलत आहे. त्याप्रमाणेच अभ्यास करीत खरेदी-विक्री बाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. सध्या वायदे बंद झाले असले तरी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक न करता टप्प्याटप्प्याने विक्री करणेच महत्वाचे आहे. अन्यथा दर वाढले म्हणून आवक वाढली तर मात्र, मोठ्या प्रमाणात घसरण होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
सोयाबीनची आवक सुरु झाली की, पावसामुळे डागाळलेल्या सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांनी केली होती. या सोयाबीनला दर कमी मिळाला असला तरी भविष्यात होणारे नुकसान टळलेले आहे. दर वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी वाळवून सोयाबीनची साठवणूक केली होती. आता त्यामधील आर्द्रतेचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे चांगल्या प्रतिचे सोयाबीन शेतकऱ्यांकडे असताना दुसरीकडे चांगला दर मिळत नाही. मध्यंतरी 6 हजार 700 वर गेलेले सोयाबीन आता 6 हजार 300 वर येऊन ठेपले आहे. शुक्रवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 16 पोत्यांची आवक झाली होती. 6 हजार 500 चा दर शेतकऱ्यांना अपेक्षित असून आता मात्र, शेतकरी टप्प्याटप्प्याने का होईना पण विक्री करीत आहे. आणि हेच फायद्याचे असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शुक्रवारी लाल तूर- 5900 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6000 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6100 रुपये क्विंटल, जानकी चना 4625 रुपये क्विंटल, विजय चणा 4625, चना मिल 4550, सोयाबीन 6500, चमकी मूग 7200, मिल मूग 6100 तर उडीदाचा दर 7011 एवढा राहिला होता.