लातूर : नाही म्हणलं तरी (Summer Season) उन्हाळी हंगामातील पिके अखेर बहरत आहेत. लांबलेला पाऊस, पाण्याची उपलब्धता आणि खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी यंदा प्रथमच (Crop Change) पीक पध्दतीमध्ये मोठा बदल झालेला आहे. शेतकऱ्यांनी मुख्य पिकांना बाजूला सारुन बेमोसमी पिकांना पसंती दिली आहे. त्यामुळे कधी नव्हे ते उन्हाळी हंगामात सोयाबीन बहरताना दिसत आहे. या हंगामात सोयाबीनला उतारा कमी असतो असे सांगितले जात असले तरी (Marathwada) मराठवाड्यात हजारो हेक्टरावर पेरा झाला आहे. शिवाय अवकाळी, वातावरणातील बदल या संकटांना सामोरे जाऊनही हे पीक बहरत आहे. उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी सर्वकाही प्रयत्न केले असून यंदा जर हा प्रयोग यशस्वी झाला तर आगामी काळात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण आहे तर हरभऱ्याच्या काढणीही मराठवाड्यात सुरु झाली आहे.
उन्हाळी हंगामात पेरणीसाठी अधिकची शेती मशागत करण्याची आवश्यकता लागत नाही. कारण खरिपापूर्वीच ही कामे उरकलेली असतात. त्यामुळे कुळपणी झाली की थेट चाढ्यावर मूठ ठेवली जाते. यंदा तर पावसामुळे पेरण्या लांबणीवर पडलेल्या होत्या. शिवाय मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्याने पीक पध्दतीमध्ये बदल केला असून कडधान्याचे प्रमाण वाढले आहे. सोयाबीन, हरभरा, करडई, राजमा ही पिके नव्यानेच घेतली जात आहे. सोयाबीनला कमी खर्च असून सध्या दरात वाढ होतानाही दिसत आहे. शिवाय खरिपात उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे मागणी कायम राहिल असा अंदाज शेतकऱ्यांनी बांधला असून क्षेत्र वाढले आहे. यापूर्वी बियाणासाठीही सोयाबीनचा पेरा केला जात नव्हता आता उत्पादनाची आशा शेतकऱ्यांना लागलेली आहे. त्यामुळे क्षेत्र वाढल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले.
यंदा प्रथमच उत्पादनाच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा केला आहे. आतापर्यंत तर सर्वकाही ठीक आहे. जर भविष्यात कीड-रोगराईचा प्रादुर्भाव झाला नाही तर शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळणार आहे. शेतकऱ्यांचा उद्देश साध्य झाला तर आगामी काळातही उन्हाळी सोयाबीन क्षेत्रात वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने गहू, ज्वारी, हरभरा पिकांचा समावेश असतो. यंदा मात्र, सोयाबीनचा नवा प्रयोग शेतकऱ्यांनी केला आहे.
सध्या सोयाबीनचे दर हे स्थिर असले तरी भविष्यात यामध्ये वाढ होणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना आहे. कारण खरिपातील सोयाबीन संपले की, पुन्हा मे महिन्यात मागणी आणि दरही वाढतात. आता उन्हाळी हंगामात सोयाबीन घेतल्याने भविष्यात मागणी वाढली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असे गणित शेतकरी मांडत आहेत. शिवाय खरिपातील बियाणाचा प्रश्नही या उन्हाळी सोयाबीनमुळे मिटलेला आहे.
आघाडीच्या काळात अन्नदात्यावरही अन्याय, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लोकप्रतिनिधींचे साखळी उपोषण
घोषणाच नाही तर अंमलबजावणीही, लातूर जिल्हा बॅंकेचा एक निर्णय अन् शेतीचा कायापालट, वाचा सविस्तर..!
ऊस तोडणी मजुरांच्या आरोग्य तपासणीचा ‘इंदापूर पॅटर्न’ ; 5 हजार मजुरांची तपासणी