लातूर : दिवाळीनंतर सोयाबीनच्या बाजारपेठेचे चित्रच बदलले आहे. दिवसागणिस घटणारे दर आता वाढत आहेत. (Latur Market Prices) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सलग पाचव्या दिवशी (Soybean Prices) सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे तर उडदाच्या दरात आता चढ-उतार होत आहे. शेतकऱ्यांना जे अपेक्षित होते तेच आता बाजारपेठेत होताना दिसत आहे. मात्र, हे दर काही दिवसापूरतेच तर नाहीत ना म्हणून शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत नसला तरी आज (सोमवारी) सलग पाचव्या दिवशी सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. वाढत्या मागणीमुळे दरात वाढ होत आहे.
खरीप हंगामाच्या सुरवातीपासून शेतकऱ्यांना साथ दिली आहे ती उडीद या पिकाने. एकीकडे सोयाबीनचे दर घसरत होते तर रब्बी हंगामाची पेरणी आणि दिवाळीच्या सणात उडदाला चांगले दर होते. त्याचाच फायदा शेतकऱ्यांना झाला होता तर यामुळेच सोयाबीनची साठवणूकही शक्य झाली होती.
ज्याप्रमाणे दिवाळीपूर्वी सोयाबीनच्या दरात दिवसाला घसरण होत होती तेच चित्र आता उलटे झाले आहे. गेल्या पाच दिवसांपासून सलग सोयाबीनच्या दरात वाढ झालेली आहे. तर गेल्या 10 दिवसांमध्ये चक्क 500 रुपयांची वाढ झाली आहे. शिवाय पावसामुळे सोयाबीन डागाळलेले असतानाही हे दर मिळत आहेत हे विशेष. सोयाबीन हे खरिपातील मुख्य पिक आहे. यातूनच नुकसान होणार असेल तर शेती खर्च आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. आता दर वाढत असताना देखील टप्प्याटप्प्याने सोयाबीन बाजारात आणले जात आहे.
यंदा पावसाचा परिणाम सोयाबीनवर झालेला आहेच. शिवाय सोयाबीन मळणीच्या दरम्यानही मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला घेऊन जाण्यापूर्वी ऊनामध्ये वाळवणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याचा दर्जा सुधारणार आहे. शिवाय आर्द्रतेचे प्रमाण हे 10 ते 12 असल्यावरच विक्रीसाठी घेऊन जाणे फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे योग्य दरही सोयाबीनला मिळणार असल्याचे मत कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी व्यक्त केले आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी सोयाबीनला सौद्यात 5800 चा दर मिळाला तर पोटलीत 5500 प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळाले आहेत. सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. असे असताना मात्र, 9 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. अचानक आवक वाढली तर त्याचा परिणाम हा दरावर होईल म्हणून शेतकरीही सावध भूमिका घेत आहेत. शिवाय भविष्यात दरवाढीचे संकेत देण्यात आल्याने शेतकरी अजूनही साठवणूकीच्याच तयारीत आहे.
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. सोमवारी लाल तूर- 6041 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5950 रुपये क्विंटल, पिंकू तूर 5957 रुपये क्विंटल, जानकी चना 5000 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4850, सोयाबीन 5802, चमकी मूग 7250, मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7301 एवढा राहिला होता.
मावळात केवळ ऊस, भातशेतीच नाही तर स्ट्रॉबेरीचेही उत्पादन
रेशीम उद्योगाला मिळणार उभारी, महारेशीम अभियनात रेशीम रथ पोहचणार गावागावात
सोयाबीनच्या दरात होतेय सुधारणा, शेतकऱ्यांना काय आहे मोलाचा सल्ला..?