नाशिक : अपेक्षित दराच्या प्रतिक्षेत (Nashik) नाशिक जिल्ह्यासह राज्यात उन्हाळी कांद्याची साठवणूक कांदाचाळीत केली जाते. यंदा खरिपातील कांद्याचे पावसामुळे नुकसान झाले होते. शिवाय कांदा मार्केटमध्ये उशिराने दाखल झाला होता. परिणामी हंगामाच्या सुरवातीला उन्हाळी कांद्यालाही चांगला दर मिळाला होता. मात्र, सध्या खरिपातील लाल कांद्यालाच अधिकची पसंती दिली जात आहे. पण मागणीनुसार पुरवठा नसल्याने लाल (Onion Market Price) कांद्याचे दर हे दिवसाकाठी वाढत आहेत. शिवाय कांदाचाळीत साठवलेल्या कांद्याचा आता दर्जाही ढासळलेला आहे. त्यामुळे नाशिकच्या बाजारपेठेत आवक उन्हाळी कांद्याची आणि दर लाल कांद्याला असेच चित्र पाहवयास मिळत आहे.
कांदा खरेदी-विक्रीच्या अनुशंगाने नाशिक ही महत्वाची बाजारपेठ आहे. येथील बाजारपेठेवरच इतर बाजारपेठेतील दर ठरतात. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे कांद्याच्या दरात कायम चढ-उतार पाहवयास मिळालेले आहेत. आता दोन्ही हंगामातील कांद्याची आवक सुरु झाली आहे. मात्र, मागणी ही खरीप हंगामातील लाल कांद्यालाच अधिकची आहे.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजारपेठेत उन्हाळ कांद्याला सरासरी 1900 तर खरीप हंगामाती लाल कांद्याला 2700 रुपये प्रति क्विटंल दर आहे. तर लासलगाव बाजारपेठेत उन्हाळी कांद्याला 1800 तर लाल कांद्याला 2200 चा दर मिळत आहे. चांदवड बाजारपेठेत उन्हाळी कांद्याला 1600 तर खरीप हंगामातील लाल कांद्याला 2200 रुपये दर मिळाला आहे. नांदगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला 1600 तर लाल कांद्याला 1500 रुपये दर मिळाला आहे.
हंगामात कांद्याला योग्य दर मिळाला नाही तर त्याची कांदाचाळीत साठवणूक केली जाते. विशेषत: नाशिक जिल्ह्यात कांदाचाळ मोठ्या प्रमाणात आहेत. यामध्ये साठवणूक केली जाते आणि अपेक्षित दर मिळाला की त्याची विक्री केली जाते. मात्र, पावसाचा परिणाम साठवलेल्या कांद्यावरही झाला आहे. बाजारात दाखल होणारा कांदा हा खरिपातील लाल कांद्यापेक्षा दर्जाहिन असल्याने लाल कांद्यालाच अधिकची मागणी आहे.
खरीप हंगामातील लाल कांद्याच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे दरही चांगलेच वधारले आहेत. या कांद्याचा उपयोग आता बिजोत्पदनासाठी केला जात आहे. यंदा पावसामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये कांद्याचाही सहभाग होता. पण खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी पुन्हा शेतकरी तयारीला लागला आहे. लाल कांद्याची खरेदी केवळ आता बिजोत्पदनासाठी केली जात आहे.