लातूर : यंदा हंगामाच्या सुरवातीचे आणि नंतरचे चित्र हे वेगळेच राहिलेले आहे. सोयाबीन असो की कापूस आणि आता तूर सुरवातीला कमी दर आणि अवघ्या महिन्यात चित्र बदलण्यास सुरवात. आतापर्यंत जे सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीत घडले तेच आता (Toor Crop) तुरीबाबत होताना दिसत आहे. यंदा उत्पादन घटूनही सुरवातीला तुरीला 5 हजार 800 पर्यंतचा दर होता. दीड महिन्यातच तुरीच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली आहे. यंदा (NAFED) नाफेडच्या माध्यमातून (Guaranteed price) हमीभाव केंद्र सुरु करण्यात आली आहेत. या खरेदी केंद्रावर तुरीला 6 हजार 300 चा दर ठरवून देण्यात आला आहे. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा कल कमी असला तरी केंद्राची स्थापना होताच बाजारपेठेतले दरही वाढले होते. आता हमीभाव पेक्षा अधिकचा दर बाजारात मिळत असल्याने या केंद्राकडे कोण फिरणार हो मोठा प्रश्न आहे. तर दुसरीकडे सोयबीनचे दर हे स्थिर असून आता आवक ही वाढत आहे.
नाफेडच्यावतीने राज्यात तूर हमीभाव केंद्र उभारण्यात आलेली आहेत. मात्र, येथील नियम-अटी आणि महिन्याभरानंतर खात्यावर पैसे यामुळे शेतकरी खुल्या बाजारातच तूर विक्रीला प्राधान्य देत होता. आता तर हमीभावापेक्षा अधिकचा दर खुल्या बाजारात मिळत आहे. त्यामुळे खरेदी केंद्र हे ओस पडले आहेत. लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवकही वाढली आहे. मंगळवारी 20 हजार पोत्यांची आवक झाली आहे. तर 6 हजार 500 दर मिळत आहे. कापूस, सोयाबीन नंतर आता तुरीच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी समाधानी आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर हे 7 हजार 300 वर स्थिरावलेले आहेत. यंदाच्या हंगामातील हा चांगला दर मानला जात आहे. शिवाय सोयाबीनची साठवणूक करुन ठेवल्याने शेतकऱ्यांना त्याचा चांगला मोबदला मिळाला आहे. सोयाबीनच्या दरातील चढ-उतार कमी झाला असून या दरम्यानच राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या बाजारपेठेमध्ये खरिपातील सोयाबीन, तूर तर रब्बी हंगामातील हरभरा या पिकाची आवक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सोयाबीन 34 हजार पोते, तूर 20 हजार तर हरभऱ्याची 40 हजार पोत्यांची आवक मंगळवारी लातूरच्या बाजार समितीमध्ये झाली होती.
Cotton : कापूस दरवाढीला ‘ब्रेक’, आता साठवणूक की विक्री..! शेतकऱ्यांनी नेमके करावे काय ?