नाशिक : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पीक मोडणीच्याच घटना समोर येत आहेत. विशेषत: रब्बी हंगामातील आणि काढणीला आलेल्या पिकांबद्दलच शेतकरी असे निर्णय घेत आहेत. मध्यंतरी अवकाळी पावसामुळे फळबांगाचे नुकसान झाले होते. त्यामधूनच शेतकरी अद्यापही सावरलेला नाही. अशातच अवकाळी पावसानंतर वातावरणातील बदलामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे तर काढणीला आलेल्या पिकाला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे हतबल शेतकरी हे अधिकचे नुकसान टाळण्यासाठी थेट पीक मोडणीवरच भर देत आहे. नाशिक जिल्ह्यात तर अशा घटना वाढत आहेत. दोन दिवसांपूर्वीच शेतकऱ्याने एक एक्कर कांद्यावर रोटोवेटर फिरवले होते. तर आता गोल्हेवाडी येथील शेतकऱ्याने मेथीच्या शेतामध्ये थेट जनावरे चारण्यासाठी सोडलेली आहे. कीड-रोगराई आणि बाजारपेठेतील कवडीमोल दर यामुळे शेतकरी टोकाचे भूमिका घेत आहेत.
अवकाळी पावसाने फळपिकांचे नुकसान तर झालेच आहे. पण त्यानंतर धुके आणि ढगाळ वातावरणामुळे कीड-रोगराईचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये रब्बी हंगामातील कांदा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता कांदा लागवड करुन दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. ऐन कांदा पोसण्याच्या दरम्यानच करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कांदा जोपासण्यापेक्षा अधिकचे नुकसान टाळण्यासाठी काढणी करुन बांधावरच फेकला जात आहे.
गेल्या दहा-पंधरा दिवसापूर्वी झालेले अवकाळी पाऊस आणि दाट धुक्याचा परिणाम आता शेती पिकांवर होण्यास सुरुवात झाली आहे. शेती पिके खराब होत असल्याने येवल्यातील शेतकऱ्याने उभे कांद्याच्या पिकानंतर अद्रक आणि आता मेथीच्या पिकावर रोटर फिरवत मेथीचे उभे पीक आता चारा म्हणून जनावरांनासमोर आहे. राज्याचे अन्न नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदार संघ असलेल्या येवल्यात तर राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे त्यांच्या नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
एकीकडे शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत आहेत तर दुसरीकडे बाजारपेठेत शेतीमालाला दर मिळत नाहीत. पपई पिकाला 2 ते 3 रुपये किलोचा दर मराठवाड्यात आहे. त्यामुळे थेरगाव येथील शेतकऱ्याने 7 एकरातील 7 हजार पपई झाडांची मोडणी केली होती. वर्षभर पपई बाग जोपासून काढणीचाही खर्च निघत नसल्याने शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते. तर नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील गोल्हेवाडी येथील शेतकरी सुभाष कोतकर यांनी एक एकर क्षेत्रामध्ये मेथीच्या भाजीचे पीक घेतले होते भाजी निघण्यास सुरुवात झाली मात्र, या मेथीच्या भाजीला कवडीमोल भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जनावरे चरण्यास सोडली तसेच मेथी भाजीच्या क्षेत्रावर ही ट्रॅक्टरच्या साह्याने रोटर मारून नष्ट करून टाकली.