नाशिक : होऊन गेलेल्या गोष्टींमध्ये बदल घडवता येत नाही पण पुन्हा ती चूक घडू नये म्हणून तरी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. याचे कारण असे की, सबंध राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन काढणीच्या वेळीच निसर्गाची अवकृपा झाली आणि सर्वकाही होत्याचे नव्हते झाले. परंतू, वेळीच प्रशासकीय यंत्रणेने प्लॅस्टिक पेपरसाठीच्या अनुदानाचा लाभ बागायत शेतकऱ्यांना दिला असता तर एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसानच झाले नसते अशा भावना आता शेतकरी व्यक्त करीत आहेत. राज्यात जवळपास 10 हजार कोटींच्या केवळ द्राक्ष बागा उध्वस्त झाल्या आहेत. याची तीव्रता ही कमी झाली असती.
द्राक्षाच्या अच्छादनासाठी प्रशासकीय स्तरावर अनुदानाची योजना आहे. प्लॅस्टिक पेपरसाठी एकरी 2 लाख 50 हजार ते 3 लाख, अँगल व तारा बांधणी यासाठी 1 लाख असा प्रति एकरसाठी 4 लाख खर्च प्रस्तावित आहे. तुलनेत मागणीनुसार शासनाने जर निम्मे 50 टक्के अनुदान दिल्यास मोठी मदत झाली असती. पण याबाबत प्रशासकीय स्तरावर कोणताही निर्णय वेळेत झाला नाही. परिणामी द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे.
दरवर्षी आता द्राक्ष काढणीच्या प्रसंगी निसर्गाचा लहरीपणा हा काय वेगळा रहिलेला नाही. त्यामुळे द्राक्ष बागांची तोडणी सुरु होताच अनुदनावर प्लॅस्टिक अच्छादन देण्याची मागणी ही जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यातील साटणा, मालेगाव, देवळा व कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली होती. यामुळे द्राक्षाचे संरक्षण झाले असते. पावसापूर्वीच 40 टक्के द्राक्षाची काढणी कामे झाले होती. उर्वरीत द्राक्षे ही या प्लॅस्टिक अच्छादनात सुरक्षित राहिली असते. मात्र, अनुदानाची मागणीकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. या भागातील जवळपास 200 कोटींचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या एका निर्णयामुळे चित्र वेगळे राहिले असते असे, शेतकऱ्यांचे म्हणने आहे.
फळपिकाचे किंवा कोणत्याही पिकाचे नुकसान झाले की, नुकसानपाहणीसाठी राजकीय नेत्यांचे दौरे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरु होतात. पण नुकसान होण्यापूर्वीपासून या भागातील शेतकरी हे प्लॅस्टिक अच्छादनासाठी अनुदानाची मागणी करीत आहेत. मात्र, पूर्तता न झाल्यामुळेच हे अधिकचे नुकसान झालेले आहे. आता नुकसानीनंतर पुन्हा पाहणी दौरे सुरु होतील आणि पुन्हा आश्वासनांच्या पावसात दुपटीने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.