माढा – पारंपरिक पिकाऐवजी वेगळ्या पिकांची लागवड केल्यास ती फायदेशीर ठरु शकते. हे दोघा भावडांनी करून दाखवलं असून माढ्याच्या (Madha) दोघा उच्च शिक्षित भावंडानी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक शेतीची (Agriculture) कास धरुन पेरु (guava) बागेची लागवड केली. तसेच ती फायदेशीर देखील ठरलीय. सागर सुभाष जाधव, सोमेश सुभाष जाधव असं त्या दोघा यशस्वी शेती प्रयोग केलेल्या भावडांची नावे आहेत. विशेष म्हणजे हा पेरु दिल्लीच्या बाजारात (Delhi Market)पोहचला असून त्याची चव देखील दिल्लीकरांना आवडली आहे.
पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शेततळे सुध्दा तयार केले
सागरने कला शाखेत पदवीधर आहे, तर सोमेशने विज्ञान शाखेतून अॅग्रीचे शिक्षण पुर्ण केले आहे. नोकरीच्या मागे न धावता दोघांनीही शेतात पारंपरिक पिके घेण्याच्या पद्धतीला छेद देत 50 टक्के सेंद्रीय शेतीचा वापर करीत जाधव यांनी दोन एकर क्षेत्रात पेरूच्या बागेची लागवड केली. नगर वरुन 33 रुपये दराने रोपे आणली, 1200 झाडे लावली. ठिंबक सिंचन प्रणालीला वापर करुन झाडांना शेतातील बोअरद्वारे पाणी देण्यात आले. पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शेततळे सुध्दा तयार केले. योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर जाधव बंधुनी पेरु लागवडीतुन चांगलं उत्पन्न मिळवून वेगळा मार्ग युवा शेतकऱ्यांना दाखवला आहे.
नैसर्गिक संकटामुळे होणारं नुकसान टाळता येतं
पिकांचे योग्य नियोजन करुन नैसर्गिक संकटामुळे होणारं नुकसान टाळता येतं. हीच बाब लक्षात घेऊन दोघा भावडांनी पेरुची लागवड केली आणि ती फायदेशीर ठरली आहे. शेतकऱ्यांनी असे प्रयोग आपल्या शेतात राबविल्यास शेतकरी समृध्दी मिळवू शकतो. हे माढ्यातील युवा शेतकरी भावडांनी कृतीतुन दाखवून दिलं आहे. दिल्लीच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी जाधव यांच्या शेतात येऊन 10 टन पेरु पॅकिंग करुन नेले आहेत.
त्यास 45 रुपये दर मिळाला आहे. तर उर्वरित 5 टन वाशी आणि सोलापूरच्या बाजारात विक्रीसाठी नेला आहे असं सागर जाधव यांनी सांगितलं.