मुंबई: महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनच्या पावसाचं पुनरागमन झालं आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं जारी केलेल्या अंदाजानुसार कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस होत आहे. तर, दुसरीकडे मराठवाड्यातील नांदेडमध्ये काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगावच्या हतनूर धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे.
कोकणात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. रात्री जोरदार पाऊस पडला तर सकाळ पासून काही भागात संततधार तर काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. सखल भागात पाणी साठले असून अनेक भागातील शेती ही पाण्याखाली गेली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ही मुसळधार पाऊस पडत असून या पावसाने चिपळूण भागाला झोडपून काढले आहे .तर, राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीला पूर आला असून राजापूर बाजारपेठेत तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. हवामान विभागाने ही दोन दिवसात कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला असून रेड अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे.तळकोकणात असाच पाऊस पडत राहिला तर जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीत जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीच्या पातळी चांगलीच वाढ झालीय. चिपळूण परिसरात पडणा-या पावसामुळे रात्री वाशिष्ठी नदिनं धोक्याची पातळी ओलांडली होती. मात्र, पहाटे पावसाचा जोर कमी झाल्या पाणापातळीत घट झाली. मात्र आता पुन्हा पावसाचा जोर वाढू लागलाय. चिपळूण शहरातील तळी वडनका या परिसरात रस्त्यावर पाणी साचलं होतं. पाऊस असाच राहीला तर चिपळूणमध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
मुसळधार पावसामुळे संगमेश्वर मधील गड नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी रात्रभर माखजन बाजारपेठेत साचलं आहे. माखजन बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांची दुकानं रात्रभर पाण्याखाली गेली होती. जिल्ह्यातील अनेक भागात रात्रभर पाऊस झाला. संगमेश्वर भागात पावसाचा जोर वाढू लागल्यामुळे माखजन बाजारपेठेला पुराचा धोका वाढला होता.
गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने लासलगांव व परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लवल्याने शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. शेतामध्ये असलेल्या विहिरीतही पाणी गेल्याने विहीर काठोकाठ भरल्या आहेत. पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट गडद झाल्याने शेतकरी हा चिंताग्रस्त झाला होता. मात्र, अचानक मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने मुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे. तसेच उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्मान झाली होती. कायाधू नदी भरून वाहत असल्याने नदीचे पाणी कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पुलावरून वाहत असल्याने नांदेड-हिंगोली महामार्गावरील रात्री वाहन सेवा काही वेळ ठप्प झाली होती. तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात ओढयाला पूर आल्याने पाण्याच्या अंदाज न आल्याने भाजीपाला विक्री करून येणाऱ्या शेतकऱ्याची एक मॅक्स जीप वाहून गेली. त्यातील दोघे जण सुख-रूप बाहेर निघाले यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोहा तालुक्यात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलं. मुरुड आगरदांडा रस्ता पाण्याखाली गेला होता. कुंडलिका नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुरुड बाजारपेठेतील रस्त्यांवर पाणी आलं होतं. रात्रभर पाऊस कोसळत होता. पहाटे थांबल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वायफना आणि आष्टी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या पावसाने शेकडो एकर शेतीचे नुकसान झालय. या पावसाने पिके वाहून गेली असून जमीन खरडून गेलीय. तर हदगाव-हिमायतनगर रस्त्यावरचे पर्यायी पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झालीय.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज पासून धरणाचे 16 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज सकाळी 7 वाजता तापी नदीपात्रात 45 हजार 803 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. येत्या काही तासात नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी नियंत्रित करण्याकरिता द्वार परिचालन करण्यात येईल व नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येईल.पुढील 24 ते 48 तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा येवा लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो. तरी तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये आणि नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे जिल्हा प्रशासनाने कडून कळविण्यात आले आहे.
Nanded | नांदेडमध्ये संततधार पावसामुळे शाळेची पडझड, नवीन इमारत देण्याची ग्रामस्थांची मागणी
Nanded Rain | नांदेडच्या हदगावमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतीचे नुकसान
Maharashtra Monsoon Update Heavy Rain fall in Various parts of state Nanded, Kokan, North Maharashtra