रत्नागिरी : आंबा फळपिक ऐन बहरात असतानाच कोकणात झालेल्या पावसामुळे आंब्याच्या मुळापासून ते मोहरापर्यंतच सर्वच गणित हे बिघडलेले आहे. त्यामुळे उत्पादनात 60 टक्के घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जाते आहे. पण यंदाचा हंगामा महिन्याभराने लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे फळबागायत शेतकऱ्यांचे तर नुकसान होणारच आहे पण खवय्येंना आंब्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. अवकाळी पावसामुळे फळबागायत शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे खऱ्या अर्थाने गणितच बिघडलेले आहे. एकतर बागा जोपासण्यासाठी लाखोंचा खर्च करावा लागला आहे तर आता मोहर लागला असतानाच पाऊस आणि वातावरणामुळे सर्व मेहनत आणि झालेला खर्च वाया जाणार असे चित्र सध्या तरी रत्नागिरी जिल्ह्यात दिसत आहे.
सध्या आंब्याला मोहोर लगडलेला आहे. असे असताना पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हा मोहोर गळून पडत आहे. म्हणजेच पावसाच्या माऱ्यामुळे आंब्याच्या लहान कैऱ्याच गळत आहेत तर दुसरीकडे पावसामुळे हवामानात आर्द्रतेचे प्रमाण हे वाढले आहे. यामुळे झाडांची मुळे पक्की होणार नाहीत परिणामी फळांची वाढही मोठ्या प्रमाणात होणार नाही. त्यामुळे पालवी फुटणार पण त्याचे फळामध्ये रुपांतरच होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आता उत्पादनाची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
आतापर्यंत आंब्याचा हंगाम लांबणीवर पडणार असल्याचे सांगितले जात होते पण गेल्या दोन दिवसांपासून अवकाळीमध्ये सातत्य राहिल्याने हंगाम लांबणीवरच नाही तर हंगामच यशस्वी होणार की नाही हा प्रश्न फळबागायत शेतकऱ्यांमध्ये आहे. कारण थेट कैऱ्यावरच परिणाम होऊ लागला आहे. शिवाय आता फवारणी करायची म्हणंल तर शेतकऱ्यांचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे यंदाचा आंब्याचा हंगाम रामभरोसेच आहे. कैऱ्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे.
सध्या फळबागांसाठी वातावरण अनुकूल असते तर उत्पादनात वाढ झाली असती पण आता ढगाळ वातावरण हे रोगराईसाठीच पोषकच आहे. त्यामुळे किडीचा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आंबा पिकावर होत आहे. सध्याच्या वातावरणात फवारणी करणे देखील मुश्किल आहे. फवारणीसाठी ऊन आवश्यक आहे. अशा वातावरणात फवारणी केली तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही.
वातावरणातील बदलामुळे आंब्यावर भुरी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. याकरिता बुरशीनाशकांचा वापर करणे हे अनिवार्य आहे. यामध्ये एक्झाकएमेझॅाल किंवा 80 टक्के सल्फर मिसळल्यास भुरा रोगापासून आंब्याचे संरक्षण होणार आहे. भुरी आणि करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी बुरशीनाशकांचा वापर महत्वाचा राहणार आहे. त्यामुळे पावसाने उघडीप दिली की, शेतकऱ्यांनी याची फवारणी करणे गरजेचे आहे.