मुंबई : नक्षलग्रस्त, जंगल परिसरातील व भौगोलिक दृष्टया दुर्गम भागातील शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसा 8 तास सवलतीच्या दरात वीज (Elecricity) पुरवठा करण्यासाठी सर्व पर्यायांची चाचपणी करा,असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आज महावितरणला दिले. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरविल्यावर महावितरणला (MSEB) अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही अशा पर्यायांचा विचार करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील वीज पुरवठा संदर्भात आज चंद्रपूरचे खासदार सुरेश धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत मुंबई स्थित महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आमदार धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा जंगल आणि लगतच्या परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेताला पाणी देण्यासाठी दिवसा वीज मिळणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला.
नक्षलग्रस्त चंद्रपूर जिल्ह्यातील कृषिपंपाना दिवसा 8 तास वीज पुरवठा केल्यास वीज खरेदीसाठी अतिरिक्त दीड कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याने यासाठी जिल्ह्यातील जिल्हा विकास योजनेतून निधी प्राप्त झाल्यास दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होईल, असे डॉ. राऊत यावेळी म्हणाले. या पर्यायाचे स्वागत आमदार धानोरकर यांनी केले आणि या पर्यायानुसार जिल्हा विकास योजनेतून हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले. दुर्गम भागात राहणाऱ्या ग्राहकांचा तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास पूर्ववत करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अश्या भागासाठी वीज दर व पुरवठा याविषयी नवीन धोरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
फसव्या संदेशांचा शोध घ्या
वीज देयकाच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने तातडीने संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, अशा स्वरूपाचे बनावट संदेश पाठवून वीज ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात फौजदारी कार्यवाही करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना आज दिले. त्यानंतर तातडीने पावले उचलत महावितरणने मुंबई आणि महाराष्ट्र सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महावितरणच्या नावाने वीज ग्राहकांची अशा पध्दतीने दिशाभूल करणे ही गंभीर बाब आहे. महावितरणची प्रतिमा मलिन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका यावेळी डॉ. राऊत यांनी घेतली. अशा फसव्या संदेशांना बळी पडू नये असे आवाहनही डॉ. राऊत यांनी ग्राहकांना केले आहे. केवळ महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्र आणि अधिकृत ऑनलाइन पेमेंट गेट वे च्या माध्यमातूनच विज बिल भरावे . याशिवाय सर्व ग्राहकांनी आपले थकित बिल भरून महावितरणला सहकार्य करावे,अशी विनंती यानिमित्ताने डॉ, राऊत यांनी ग्राहकांना केली आहे.