नांदेड : ऊसतोडणीच्या काळात मुकादम आणि ऊसतोड मजूर यांच्यामध्ये अनेकवेळा फसवणूकीच्या घटना घडतात. असाच प्रकार नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे समोर आला आहे. बालमजूरासह 18 जणांची दिशाभूल करुन त्यांना कंधार येथील एका मुकादमाकडे ठेवण्यात आले होते. मुकादमाने या मजुरांकडून ऊसतोडणीचे काम तर करुन घेतले पण त्यांना मजूरी दिली नाही. उलट मारहाण करुन मजुरांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांना शेतातच डांबून ठेवले. या प्रकरणात उस्मान नगर पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करत मजूरांची सुटका केली आहे.
नांदेडमधील एकाने मध्यप्रदेशातील मजुरांना विश्वासात नागपूर किंवा त्या परिसरात ऊस तोडणीचे काम देतो असे सांगून त्यांना या कामासाठी नांदेडला आणले. यानंतर त्याने कंधार तालुक्यातील गोविंद केंद्रे या मुकादमाकडे तुम्ही काम करा असे सांगून मजुरांना तेथे कामासाठी सोडले. मजबुरीने मजुरांनी कंधार तालुक्यात ऊस तोडणीचे काम केले. पण हे काम केल्यानंतर मुकादमाकडे मजुरीचे पैसे मागितले असता मुकदमाने टाळाटाळ करीत नंतर त्यांना धमकावणे सुरू केले.
मुकदमाने मजुरांना खाणे पिणे व्यवस्थित देणे बंद केले. तसेच त्यांच्या लहान मुलांनाही कामाला जुंपले. मुकादमाचा हा जाच सहन न झाल्याने या मजुरांपैकी एकाने संधी साधून मध्य प्रदेशातील आपल्या एका नातेवाईकाला हा सर्व प्रकार सांगितला. यानंतर मजुराच्या नातेवाईकांनी मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ही बाब त्यांना सांगितली. त्यानंतर बालाघाटच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केल्यानंतर जिल्हाधिकारी इटनकर यांनी तत्काळ हालचाल केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी आपलं पथक पाठवून या सर्व कामगारांची मुकादमाच्या तावडीतून सुटका केली आहे.
हाताला काम देतो म्हणून परराज्यातून घेऊन आलेला मुकादम आणि केंद्रे यांनी केलेली पिळवणूक या प्रकरणी दोघांविरुद्ध उस्माननगर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि बालमजुरी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकारानंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या मजुरांना मध्य प्रदेशला रवाना केले आहे.